Home | International | Pakistan | Emraan desire to invite modi on pm oath ceremony

इम्रान यांच्या पक्षाची समारंभासाठी मोदींना निमंत्रण देण्याची इच्छा

वृत्तसंस्था | Update - Aug 01, 2018, 08:51 AM IST

शपथ समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्याचा विचार पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ करत आहे.

 • Emraan desire to invite modi on pm oath ceremony

  लाहोर- इम्रान खान ऑगस्टमध्ये पाकिस्तानचे नूतन पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारतील, हे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यांच्या शपथ समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्याचा विचार पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ करत आहे.


  नुकत्याच झालेल्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत ६५ वर्षीय इम्रान खान यांचा पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी झाला आहे. आता पीटीआयने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. खान ११ ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. पीटीआयच्या कार्यकारी समितीचा सार्क परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्याचा विचार आहे. त्यात मोदी यांनाही निमंत्रण देण्यावर विचार-विनिमय सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


  मोदींनी खान यांचे विजयाबद्दल केलेले अभिनंदन हे देखील दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या दिशेने असलेले महत्त्वाचे ठरणार आहे. उभय देशांत त्यामुळे नव्या अध्यायाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. पीटीआयचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी देखील मोदींना निमंत्रण देण्याविषयी पक्ष अनुकूल असल्याचे संकेत दिले आहेत. परंतु त्याबद्दलचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत होईल, असे त्यांनी सांगितले.


  २०१६ पासून तणाव

  भारत-पाकिस्तानमध्ये २०१६ पासून तणाव जास्त वाढला. पाकिस्तानातील दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यानंतर कुलभूषण जाधव यांना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखीनच वाढला होता.


  राजकीय शत्रूसोबत भागीदारीचे प्रयत्न
  पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीवर अनेक दशकांपासून एमक्युएम-पीचे राज्य राहिले आहे. पीटीआय केंद्रस्तरावर सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. पीटीआयच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एमक्यूएम-पी ने सहभागी व्हावे यासाठी मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत राजकीय वैरी म्हणून आेळख कायम ठेवली होती. आता हेच राजकीय वैरी सत्तेच्या भागीदारीवर वाटाघाटी करण्यात व्यग्र झाल्याचे दिसून आले. पीटीआयला ११६ जागी विजय मिळाल्याचे जाहीर झाल्यापासूनच एमक्यूएम-पीचे राजकीय महत्त्व आणखी वाढले.


  अमेरिकेसोबतचे संबंंध सुधारण्यावर भर
  अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानचे राजदूत अली जहांगिर सिद्दीकी व संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्यात झालेल्या चर्चेत द्विपक्षीय संंबंध सुधारण्यावर सहमती झाली आहे. पेन्टागॉनमध्ये मंगळवारी दोन्ही नेत्यांत ही बैठक झाली.

Trending