पाकिस्तानचा फिल्मी निवडणूक / पाकिस्तानचा फिल्मी निवडणूक प्रचार; बॉलीवूडच्या रिमिक्सवर, पक्षांच्या थीम साँगवर समर्थकांचे बेधुंद नृत्य

पाकिस्तानमध्ये सोमवारी रात्री १२ वाजताच निवडणूक प्रचार थांबला. आता बुधवारी नव्या सरकारसाठी मतदान होईल. या वेळी राजकीय पक्षांच्या सभांत डीजेचा नवा ट्रेंड दिसला. पक्षांनी यंदा देशातील प्रख्यात डीजेंना सभांत गाण्यांसाठी बोलावले होते. पक्षांनी थीम साँगही बनवले.

दिव्य मराठी

Jul 24,2018 09:22:00 AM IST

लाहोर- पाकिस्तानमध्ये सोमवारी रात्री १२ वाजताच निवडणूक प्रचार थांबला. आता बुधवारी नव्या सरकारसाठी मतदान होईल. या वेळी राजकीय पक्षांच्या सभांत डीजेचा नवा ट्रेंड दिसला. पक्षांनी यंदा देशातील प्रख्यात डीजेंना सभांत गाण्यांसाठी बोलावले होते. पक्षांनी थीम साँगही बनवले.


डीजेद्वारे गर्दी जमवली जावी आणि समर्थकांत उत्साह यावा हा हेतू. विशेष म्हणजे या सभांत भारतीय गाणीही वाजली. त्यात ‘मेरे रश्क-ए-कमर,’ ‘साड्डी गली भूल के भी आया करो..’वरील रिमिक्स पाकिस्तानी गाणीही होती. पाकिस्तानात १९८० च्या दशकात पॉप संगीत आल्यानंतर पक्षांच्या घोषणा त्याच धर्तीवर तयार झाल्या. पण २०११ आणि २०१३ मध्ये पीटीआयसाठी डीजे आसिफ बटने सभांत ही संकल्पना सुरू केली होती. या वेळी बट पीएमएल-एनसाठी गाणी वाजवत आहे. शहरी भागात पॉप संगीत तर ग्रामीण भागात शास्त्रीय गाणी लोकगीते वाजवली जात आहेत.


तीन प्रमुख पक्षांचे थीम साँग...

पीएमएल (एन): वोट को इज्जत दो थीम साँग
‘वोट को इज्जत दो’ हे पीएमएलचे प्रचार गीत होते. त्याशिवाय पक्षाने ‘दिलों की धडकन नवाज शरीफ’, ‘रोक सको तो रोक लो’ आणि ‘शेर हमारा है’ ही गाणीही बनवली.

पीटीआय :बनेगा नया पाकिस्तान, तब्दीली आई रे
पीटीआयचे थीम साँग ‘बनेगा नया पाकिस्तान’ आणि ‘तब्दीली आई रे’ ही आहेत. २०१३ च्या निवडणुकांत इम्रानच्या पक्षाने या संकल्पनेने युवकांना आकर्षित केले होते.

पीपीपी: ‘दिला तीर बिजा’वर लोकांचे नृत्य
पीपीपीचे थीम साँग ‘दिला तीर बिजा.’ १९८० पासून हे गाणे चालत आहे. हे गाणे आजही लोकांना खूप आकर्षित करते. यंदा ‘बिलावल बिलावल’ थीम साँग बनवले आहे.


पाक निवडणुकीत भारताचे कनेक्शन...
माधुरी-अमिताभच्या नावावर मागितली मते

पीटीआय उमेदवार अब्बास डागर अमिताभ आणि माधुरी दीक्षितचे चाहते आहेत. त्यांनी पोस्टरवर त्यांचे फोटो लावले आहेत.


पोस्टरवरून महिला उमेदवार गायब
यंदा १७१ महिला नॅशनल असेम्ब्लीसाठी मैदानात आहेत. पण रूढिवादी समाजामुळे त्यांनी पोस्टरवरही जागा मिळाली नाही. निवडणूक आयोगाने यंदा सर्व पक्षांसाठी ५% महिला उमेदवारांचा कोटा निश्चित केला आहे.


केंद्रांवर ६०% सैनिक तैनात
३, ७१,०० सैनिक पूर्ण देशात मतदान केंद्रांत आणि बाहेर तैनात केले जात आहेत. प्रथमच लष्कराला मतपत्रिका ते केंद्रांपर्यंतची जबाबदारी मिळाली आहे. २०१३ च्या तुलनेत तिप्पट सैनिक तैनात आहेत. निवडणुकीत लष्कराचा हस्तक्षेप असल्याचे एका सर्वेक्षणात ३८% नी मानले.


एका मतावर आयोगाचा १९८ रु. खर्च
या निवडणुकीवर ४४० अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च होत आहेत. ती २०१३ पेक्षा १०% जास्त आहे. आयोग एका मतावर सुमारे १९८ रुपये खर्च करत आहे.


सर्वेक्षणात इम्रानच पुढे
आतापर्यंतच्या बहुतांश सर्वेक्षणांत इम्रान खानच्या पीटीआय आणि नवाज यांच्या पीएमएलएन (एन) यांच्यात कडवी लढत आहे. पीटीआयला पीएमएल-एनपेक्षा ४% मताधिक्य मिळत आहे. बिलावल भुत्तोंच्या नेतृत्वाखालील पीपीपी तिसऱ्या स्थानी आहे.

X
COMMENT