आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलभूषण जाधव आज पत्नी, आईला भेटणार; भारताचे उप उच्चायुक्तही राहणार उपस्थित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेले कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि आई सोमवारी इस्लामाबादमध्ये दाखल होणार आहेत. भारताचे उप उच्चायुक्त जे.पी. सिंग त्यांच्यासोबत असतील.


२५ डिसेंबर रोजी जाधव यांची पत्नी व आई पाकिस्तानात पोहोचल्यानंतर भेट घेतील आणि त्याचदिवशी त्या मायदेशी परततील, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद फैजल यांनी शनिवारी ट्विट करून दिली. कुटुंबियांच्या भेटीसोबतचे छायाचित्र आणि व्हिडिआे देखील नंतर जारी केला जाईल. इस्लामिक परंपरा आणि मानवतेच्या पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे फैजल यांनी सांगितले.


जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घडवून आणण्याचे वेळापत्रक लवकरात लवकर तयार करून द्यावे. अन्यथा नंतर ही भेट कठीण होईल, असे पाकिस्तानने कळवले होते, असे प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून अगोदरच स्पष्ट झाले होते. त्याच्या काही दिवसानंतर २० डिसेंबरला पाकिस्तानने जाधव यांची पत्नी, आईला व्हिसा जारी केला. जाधव (४७) यांच्यावर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाचा गंभीर आरोप ठेवून त्यांना दोषी ठरवले. त्याचबरोबर मृत्यूदंडाची शिक्षाही ठोठावली. एप्रिलमध्ये ही शिक्षा झाली होती. परंतु भारताने त्यावर आक्षेप घेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे कैफियत मांडली. भारताच्या याचिकेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने शिक्षेला अापल्या अंतिम निर्णयापर्यंत स्थगित केले होते. 


वकिलातीच्या संपर्काला वारंवार दिला नकार
भारताने जाधव यांच्याशी वकिलातीच्या माध्यमातून संपर्क ठेवण्याची परवानगी मागितली, परंतु पाकिस्तानने ही विनंती वारंवार फेटाळून लावली. जाधव सामान्य व्यक्ती नाही. हेरगिरी करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानात घुसखोरी केल्याचा गंभीर आरोप असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. भारताने मात्र जाधव यांचे इराणमधून अपहरण झाले असल्याचे सातत्याने सांगितले आहे. जाधव नौदलातून निवृत्त होऊन इराणमध्ये व्यवसाय करत होते.

बातम्या आणखी आहेत...