आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला ‘साहेब’ असे संबोधन वापरले आहे. पाकिस्तानच्या एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्बासी म्हणाले की, पाकिस्तानमध्ये हाफिज सईद ‘साहेब’ यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. जर एखाद्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तर निश्चितपणे कारवाई होईल.
ज्याच्या आधारावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकेल, असा कुठलाही पुरावा भारताने हाफिज सईदच्या विरोधात सादर केला नाही, असे वक्तव्य नोव्हेंबर २०१७ मध्येही अब्बासी यांनी केले होते. हाफिज सईद आणि त्याच्या संघटनांवर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली आहे. अमेरिकेने हाफिज सईदवर ६ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.
भारताशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे दरवाजे खुलेच
अब्बासी म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रसज्ज शेजारी देशांदरम्यान कुठल्याही प्रकारच्या युद्धाची शक्यता मला तरी सध्या दिसत नाही. भारताशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे दरवाजे नेहमीच खुले असतात. आताही ते खुले आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या (सीपीईसी) विरोधात भारत अपप्रचार करत आहे, असा आरोपही अब्बासी यांनी केला. हा कॉरिडॉर ग्वादर बंदरापासून सुरू होऊन तो पाकला चीनशी जोडणार आहे.
जम्मू ; पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार
पाकिस्तानी लष्कराने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय लष्करातील एक कॅप्टन जखमी झाला. पाकिस्तानी लष्कर चकन दा बाग भागात मंगळवार सायंकाळपासून गोळीबार करत आहे. भारत त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे.
जम्मू; वणव्यामुळे भूसुरुंगांचा स्फोट
राजौरी-पूंछ भागात वणव्यामुळे भूसुरुंगांचा स्फोट झाल्यामुळे मंगळवारी या भागातील नागरिक चांगलेच भयभीत झाले होते. भूसुरुंग निकामी करण्यासाठी तसेच दहशतवाद्यांना घुसखोरी करणे सोपे व्हावे यासाठी पाकिस्ताननेच जंगलात आग लावली असावी, असा संशय भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही घटना बालाकोट भागात घडली. पाकव्याप्त काश्मीरच्या जंगलात ही आग लागली आणि नंतर ती भारतीय सीमेतील जंगलात पसरली. त्यामुळे भूसुरुंगांचे स्फोट सुरू झाले. त्यामुळे सीमा भागातील लोक घाबरले होते. आगीत शेकडो झाडे खाक झाली असून काही प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. हा वणवा बुधवारी नियंत्रणात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.