आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट बँक खाते प्रकरण : झरदारींसह बहिणीच्या परदेश प्रवासावर पाक कोर्टाची बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- बनावट बँक खाते प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष अासिफ अली झरदारी व त्यांची बहीण फरयाल तालपूर यांना परदेशात जाण्यास मनाई केली आहे. 


मुख्य न्यायमूर्ती साकिब निसार यांनी २० जणांची यादी जाहीर केली आहे. त्यात झरदारी व तालपूर यांच्या नावाचाही उल्लेख आहे. बनावट बँक खात्यांसंबंधीच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती निसार यांनी हा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सात बनावट बँक खातेदार व १२ लाभार्थींना समन्स पाठवले आहे. १२ जुलै रोजी हे समन्स पाठवण्यात आले आहे. झरदारी, तालपूर, तारिक सुलतान, एरम अकील, मोहंमद अशरफ, मोहंमद इक्बाल अरिन इत्यादी नावे यादीत आहेत. यादीत नावे असलेल्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सिंध पोलिसांना यासंबंधीची सूचना पाठवण्यात आली होती. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, झरदारी हे पाकिस्तानचे अकरावे राष्ट्राध्यक्ष म्हणून २००८ ते २०१३ दरम्यान या पदावर कार्यरत होते. १९८७ मध्ये त्यांचा बेनझीर भुत्तो यांच्याशी विवाह झाला होता. भुत्ताेंच्या निधनानंतर पीपीपीने २००८ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. 


सात लोकांच्या नावे २९ खाती 
बनावट बँक खात्याच्या घोटाळ्यात सात लोकांच्या नावे २९ खाते सुरू करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यात काही खाती महिलांच्याही नावे आहेत. समिट बँकेत १८ ते १९ बनावट खाती सुरू करण्यात आल्याचे तपासात उजेडात आले आहे.

 
झरदारी समूहाला दीड कोटी रुपये 
झरदारी तसेच त्यांची बहीण तालपूर यांच्या झरदारी समूहाला या बनावट बँक खात्यावर सुमारे दीड कोटी रुपये मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. बनावट बँक खात्यांत एकामधून दुसऱ्या खात्यावर मोठ्या रकमा पाठवण्याचा उद्योग केला जात होता. केवळ दहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४.५ अब्ज रुपयांच्या ठेवींचा व्यवहार झाल्याचेही आढळून आले आहे, असे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

 

बनावट खात्यांच्या लाभार्थींची नावे 

नासीर अब्दुल्ला, अन्सारी साखर कारखाना, आेम्नी पॉलिमर पॅकेजेस, पाक इथेनॉल प्रा. लिमिटेड, चामबर साखर कारखाना, अॅग्रो फर्म थाट्टा, झरदारी समूह, पार्थेनॉन प्रा. लिमिटेड, ए-वन इंटरनॅशनल, लकी इंटरनॅशनल, लॉजिस्टिक ट्रेडिंग, रॉयल इंटरनॅशनल व अमीर असोसिएट इत्यादी आस्थापनांना बनावट खात्यांचा लाभ झाल्याचा आरोप आहे. 


कशासाठी केला खटाटोप ? 
बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून पाकिस्तानातील धनाढ्य आपल्याजवळील काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातही उद्योजक आपले उखळ पांढरे करण्यासाठी अशी खाती चालवतात, अशी माहिती झरदारी यांचे निकटवर्तीय अन्वर माजिद यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...