Home | International | Pakistan | Pakistan elections: Imran Khan's 'Tehrik' leads on 103 places

पाकिस्तान निवडणूक: 103 जागी इम्रान खानचा 'तहरीक' आघाडीवर; मतदानावेळी हल्ला, 31 ठार

वृत्तसंस्था | Update - Jul 26, 2018, 10:35 AM IST

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत प्राथमिक फेरीत माजी क्रिकेटपटू इम्रान खानचा तहरीक-ए-इन्साफ पक्ष १०३ जागी आघाडीवर आहे,

 • Pakistan elections: Imran Khan's 'Tehrik' leads on 103 places

  इस्लामाबाद- पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत प्राथमिक फेरीत माजी क्रिकेटपटू इम्रान खानचा तहरीक-ए-इन्साफ पक्ष १०३ जागी आघाडीवर आहे, तर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाला ५९ जागांवर आघाडी मिळाली आहे.


  २७२ पैकी २०९ जागांचे कल रात्री उशिरा हाती आले. माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पक्ष ३४ जागांवर आघाडी घेऊन किंगमेकर ठरू शकतो. अपक्ष उमेदवारही १८ जागांवर आघाडीवर आहेत. पाक नॅशनल असेंब्लीत एकूण ३४२ सदस्य असून यातील २७२ सदस्य जनतेतून निवडले जातात. ६० जागा महिलांसाठी व १० जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत. बहुमतासाठी १३७ जागा आवश्यक आहेत. दरम्यान, क्वेट्टामध्ये मतदानादरम्यान झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ३१ जण ठार झाले. ६७ जण जखमी आहेत.

  पाकमध्ये अनेक ठिकाणी महिलांना सैन्य, पुरुषांनी मतदानापासून रोखले
  इस्लामाबाद: पाकिस्तानात ११ व्या नॅशनल असेंब्ली व प्रांत विधानसभांसाठी बुधवारी हिंसाचारादरम्यान मतदान झाले. सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर लगेच मतमोजणीलाही सुरुवात झाली. गुरुवारी दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र बुधवारी मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी महिलांना आपला हक्क बजावण्यापासून रोखण्याचे नापाक प्रयत्न झाले. सांगला जिल्ह्यात तर २५४ मतदान केंद्रांपैकी केवळ ७ मतदान केंद्रांवर महिलांना लोकशाहीतील हक्क बजावता येऊ शकला. उर्वरित सर्व ठिकाणी महिलांना पुरुषांनी आणि सैनिकांनीच रोखल्याचे दिसून आले. सांगलामध्ये १.६२ लाख महिला मतदार होत्या. त्यापैकी ९५ टक्के महिलांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अनेक विधानसभांतदेखील एकही महिला मतदान करू शकली नाही. खैबर पख्तुनख्वाच्या अनेक मतदान केंद्रांवर महिलांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले. दुसरीकडे ज्या मतदारसंघात महिला मतांचा टक्का १० पेक्षा कमी असेल, अशा ठिकाणी पुन्हा मतदान घेतले जाईल, असा नियम पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने घेतला आहे. रात्री उशिरा मतमोजणीत पीटीआयने आघाडी घेतली होती.


  वजिरिस्तानात पहिल्यांदाच महिलांचे मतदान, पीटीआयची मतमोजणीत आघाडी
  डिर, कोहिस्तान व उत्तर-दक्षिण वजिरिस्तानमध्ये महिलांनी पहिल्यांदाच मतदान केले. अफगाणिस्तानपासून पाच किमी अंतरावरील बायजाईमध्ये महिलांनी पहिल्यांदाच मतदान केले. निवडणूक आयोगाने मशिदीच्या ध्वनिक्षेपकावरून महिलांना मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. दुसरीकडे पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शाकिब निसार म्हणाले, मी २५ जुलै रोजी निवडणूक घेण्याच्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या व मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने लाहोरमध्ये मतदान केले.


  इम्रान, शाहबाज, बिलावल पंतप्रधानपदाचे दावेदार
  पीटीआयचे प्रमुख इम्रान खान पंतप्रधानपदाचे सर्वात बळकट दावेदार मानले जातात. गतवेळी त्यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नवाझ शरीफ व मरियम निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर शाहबाज हेच पक्षाचा मोठा चेहरा आहेत. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना पक्षाने पीएम उमेदवार म्हणून पुढे आणले आहे.


  पाकिस्तानातील निवडणूक निकालावरून चीनला चिंता
  पाकिस्तानातील निवडणुकीच्या निकालावरून सर्वात जास्त चिंता चीनला आहे. कारण चीन व पाकिस्तान यांच्यात आर्थिक प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. त्यावर चीनने सुमारे ६२ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. निवडणूकपूर्व पाहणीत पीटीआय सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबत नवे सरकार काय भूमिका घेईल, यावरून चीन चिंतित आहे. कारण उलट भूमिका घेतल्यास त्याचा आर्थिक फटका बसू शकतो.

Trending