Home | International | Pakistan | Pakistan to hold general elections on July 25

पाकिस्तानमध्ये 25 जुलैला होणार सार्वत्रिक निवडणूक, इम्रान खान निवडणूक लढवणार

वृत्तसंस्था | Update - May 28, 2018, 04:52 AM IST

पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक २५ जुलै रोजी होणार आहे. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी निवडणूक आयोगाच्या प्रस्तावित तार

 • Pakistan to hold general elections on July 25

  इस्लामाबाद - पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक २५ जुलै रोजी होणार आहे. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी निवडणूक आयोगाच्या प्रस्तावित तारखेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) व विरोधक यांच्यातील रस्सीखेच लवकरच संपू शकेल.


  पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाने २५ किंवा २७ जुलै या तारखांचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्षांकडे पाठवला होता. परंतु हुसेन यांनी २५ जुलै निश्चित केली. सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे इम्रान खान हे सत्ताधारी पक्षासाठी मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष अासिफ अली झरदारी नवाबशहा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. किमान २४ वर्षांनंतर ते संसदीय राजकारणात परतणार आहेत. शनिवारी सायंकाळी सिंधचे मुख्यमंत्री सईद मुराद अली यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत ते सहभागी झाले होते. त्यात झरदारी यांनी ही घोषणा केली होती. भुत्तो यांच्या निधनानंतर त्यांचे महत्त्व संपुष्टात आले होते.


  विद्यमान सरकारचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर १ जूनपासून हे सरकार काळजीवाहू सरकार म्हणून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काम करेल. २०१३ मध्ये पाकिस्तानात पहिल्यांदाच पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाला लोकशाही मार्गाने सत्ता सोपवण्यात आली होती. तेव्हाच्या निवडणुकीत या पक्षाने अतिशय चांगली कामगिरी केली होती. पाकिस्तानच्या निवडणुकीत किमान ५ कोटी ९० लाख मतदार आपला हक्क बजावतील.

  काळजीवाहूचा वाद
  विद्यमान सरकारचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. आता दैनंदिन कामकाज पाहण्याची तात्पुरती व्यवस्था म्हणून काळजीवाहू पंतप्रधान हवा आहे. मात्र पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी व विरोध पक्षनेते खुर्शीद शहा यांच्या या मुद्द्यावरून सहमती झालेली नाही. दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत डझनावर बैठका घेतल्या. परंतु त्यातून दोन्ही नेत्यांत सहमती होऊ शकली नाही.

Trending