Home | International | Pakistan | Partiality in Pakistan elections: EU accusation

पाकिस्तानातील निवडणुकीत पक्षपातीपणा : ईयूचा आरोप

वृत्तसंस्था | Update - Jul 28, 2018, 08:28 AM IST

पाकिस्तानात संसदेच्या निवडणुकीत पक्षपातीपणा झाल्याचे युरोपियन युनियन(ईयू )च्या निगराणी दलाने शुक्रवारी म्हटले.

 • Partiality in Pakistan elections: EU accusation

  इस्लामाबाद- पाकिस्तानात २५ जुलै रोजी झालेल्या संसदेच्या निवडणुकीत पक्षपातीपणा झाल्याचे युरोपियन युनियन(ईयू )च्या निगराणी दलाने शुक्रवारी म्हटले. ईयूच्या निगराणी दलाने म्हटले, निवडणूक मोहिमेत सर्वांना योग्य संधी देण्यात आलेली नाही. ईयूचे पाकिस्तानातील निवडणूक पर्यवेक्षण मोहिमेचे मुख्य पर्यवेक्षक मायकेल गहलर यांनी मतदानाच्या प्रारंभिक मूल्यांकनाच्या आधारावर म्हटले, निवडणुकीत सर्वांना समान संधी देण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या होत्या. परंतु यात सर्वांना समान आणि पर्याप्त संधी नव्हती.


  पीएमएल-एन व पीपीपीकडून घोटाळ्याचे आरोप : तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ व त्यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग -नवाझ (पीएमपीएल -एन)यांनीही निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. लष्करातील काही घटकांनी मोहीम दडपली. मतमोजणीच्या वेळी आमच्यावर अन्याय केला. माजी पंतप्रधान आसिफ अली झरदारींच्या पक्षानेही निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे.


  इम्रान खानला छोटे पक्ष व अपक्षांच्या पाठिंब्याची गरज : क्रिकेटपटू ते राजकीय नेता असा प्रवास झालेल्या इम्रान खानचा पक्ष तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय)ला संसदेच्या एकूण २७२ जागांपैकी शुक्रवारी सायंकाळपर्यंत घोषित झालेल्या २६२ जागांपैकी ११४ जागांवर विजय मिळाला आहे. पीटीआय मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना छोटे पक्ष व अपक्षांची गरज आहे.


  पंजाब प्रांतातही इम्रान खानचे सरकार : भारतीय सीमेलगत असलेल्या पाकिस्तानातील पंजाब राज्यात इम्रान खानचा पक्ष पीटीआय सरकार स्थापन करू शकतो. येथील एकूण २९७ जागांपैकी पीएमएल-एनला १२७, पीटीआयला १२३ व अपक्षांना २९ जागा मिळाल्या आहेत. बहुमतांसाठी १४९ जागांची आवश्यकता असते. पीटीआय अपक्ष व अन्य पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू शकते. दहशतवाद्यांचा प्रभाव असलेल्या खैबर-पख्तुनवामध्ये पीटीआयला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. येथे एकूण ९९ पैकी ६६ जागांवर पीटीआय विजयी झाला. एमएमएला १० जागा मिळाल्या. सिंध प्रांतात एकूण १३१ जागांपैकी पीपीपीला ७४ जागा मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. तेथे त्यांचे सरकार येईल. येथे पीटीआयला २२ व एमक्यूएमला १६ जागा मिळाल्या आहेत. बलुचिस्तानात एकूण ५१ जागांपैकी बलुचिस्तान अवामी पार्टी १३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एमएमएला ९ जागा मिळाल्या. तो दुसऱ्या स्थानावर राहिला.


  सत्ता स्थापनेसाठी हवा १७२ चा जादुई आकडा
  पाकिस्तानच्या संसदेत एकूण ३४२ जागा आहेत. यापैकी २७२ जागांवर थेट निवडणूक होते. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमतासाठी १७२ जागांची आवश्यकता असते. आरक्षित जागांसह पीटीआयकडे एकूण १६० जागा आहेत. यापैकी २९ महिला व ४ अथवा ५ अल्पसंख्याकांसाठी आरक्षित जागा आहेत. इम्रान खानला एकूण १७३ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजे त्यांच्या पक्षाचा पंतप्रधान होणे जवळपास निश्चित आहे. एमएमएला १० जागा मिळाल्या.


  संसद निवडणुकीचे निकाल (एकूण जागा : २७२)
  पक्ष - संख्याबळ
  पीटीआय - ११४
  पीएमएल - ६३
  पीपीपी - ४३
  अपक्ष - १२
  एमक्यूएम - ०६

Trending