Home | International | Pakistan | Sharif is now ineligible for public office

शरीफ सार्वजनिक पदासाठी आता हयातभर अपात्र; न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

वृत्तसंस्था | Update - Apr 14, 2018, 02:00 AM IST

भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सार्वजनिक पदासाठी हयातभ

 • Sharif is now ineligible for public office

  इस्लामाबाद- भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सार्वजनिक पदासाठी हयातभर अपात्र असल्याचा निवाडा दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या पीठाने सर्वानुमते संविधानातील लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवण्याचा नियम तहहयात लागू केला जातो, असे न्यायालयाने निकालाद्वारे स्पष्ट केले.


  लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा नियम लागू करण्याच्या कालावधीवरून निर्माण झालेला संशय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता संपला आहे, असे पाकिस्तानातील प्रसार माध्यमांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या संविधानातील कलम ६२ (१) (एफ) मध्ये लोकप्रतिनिधीच्या अपात्रतेच्या शर्ती सांगण्यात आल्या आहेत. परंतु त्याच्या कालावधीबाबत मात्र संविधानात काहीही स्पष्ट उल्लेख आढळून येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै २०१७ रोजी पनामा पेपर्स घाेटाळ्यात नवाझ शरीफ यांना याच कलमा अंतर्गत पंतप्रधान पदासाठी अपात्र ठरवण्यात आले होेते.


  अपात्र ठरवण्यात आलेला व्यक्ती राजकीय पक्षाचा प्रमुख होऊ शकत नाही, अशी पाकिस्तानची राज्यघटना सांगते. निवडणूक लढवता येणार नाही : तीन वेळा देशाचे पंतप्रधान पद सांभाळणारे शरीफ यांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. गतवर्षी तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते जहांगिर तरिन यांना १५ डिसेंबर रोजी सार्वजनिक पदासाठी अपात्र ठरवण्यात आले होते.


  ‘हा तर विनोद. आधीही १७ पंतप्रधानांशी असाच खेळ’
  शरीफ यांना सार्वजनिक पदापासून दूर ठेवण्याबाबतचा निकाल म्हणजे विनोद होय. अगोदरही देशात १७ पंतप्रधानांना अशा खेळांना सामोरे जावे लागले आहे. त्यात नवे काही नाही. अगदी दिवंगत पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो, बेनझीर भुत्तो यांनाही अशा निकालास सामोरे जावे लागले होते, अशा शब्दांत माहिती राज्यमंत्री मरियम आैरंगजेब यांनी निकालाची खिल्ली उडवली. त्याचबरोबर शरीफ यांच्या विरोधातील निकाल अगोदर आला आणि सुनावण्या मात्र नंतर आहेत, असा दावा त्यांनी केला. शरीफ पंजाबचे सिंह आहेत. त्यांना तीनवेळा जनतेने निवडून दिले आहे. देशात स्थैर्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, असे मरियम यांनी सांगितले.

Trending