आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युसूफ सलीम पाकचे पहिले दृष्टिहीन जज; सरन्यायाधीश साकिब निसार यांनी केली मध्यस्थी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- पाकिस्तानात युसूफ सलीम हे पहिले दृष्टिहीन न्यायाधीश झाले आहेत. मंगळवारी त्यांनी पदाची शपथ घेतली. लाहोर येथील रहिवासी असलेल्या युसूफ यांना पद देण्यास नकार दर्शवला होता; परंतु सरन्यायाधीश मियां साकिब यांनी दखल घेतल्यानंतर त्यांना न्यायाधीश करण्यात आले. लाहोर उच्च न्यायालयातील २१ न्यायाधीशांत त्यांचा समावेश झाला आहे. या वेळी मुख्य न्यायाधीश महंमद यावर अली यांनी सर्व न्यायाधीश आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. 


ते म्हणाले, कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला ते कोणताही भेदभाव व भय न बाळगता यथोचित न्याय मिळवून देतील. युसूफ पंजाब सरकारमध्ये सहायक संचालक (कायदा) पदावर कार्यरत होते. त्यानंतर दिवाणी न्यायाधीशांच्या लेखी परीक्षेत त्यांची निवड झाली. यामध्ये एकूण ३०० उमेदवारांची निवड झाली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या मुलाखतीत दृष्टिबाधित असल्याने त्यांना या पदासाठी योग्य ठरवण्यात आले नाही आणि त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली नव्हती. या प्रकरणात दखल घेत पाकिस्तानचे सरन्यायाधीश साकिब यांनी लाहोर न्यायालयाच्या न्यायाधीशांना या प्रकरणाचे अवलोकन करण्याचे आदेश दिले. एखादा उमेदवार सर्व मानकांवर सक्षम ठरत असेल तर केवळ दृष्टिबाधित असल्याने त्याची निवड अपात्र आहे असे म्हणता येणार नाही, असे सरन्यायाधीशांचे मत होते. त्यानंतर १२ मे रोजी युसूफ यांना लाहोर न्यायालयाकडून आणखी एक पत्र आले. त्यात न्यायाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याचे कळवण्यात आलेे. लाहोर न्यायालयाच्या परीक्षा समितीने दिवाणी न्यायाधीश म्हणून तुमची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे, असे या पत्रात म्हटले होते . 


राजस्थानातही दृष्टिहीन जज
राजस्थानात दृष्टिहीन असलेले ब्रह्मानंद शर्मा २०१६ पासून न्यायाधीशपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांनी २०१३ मध्ये न्यायिक सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. 


लहानपणापासून दृष्टिहीन आहेत युसूफ 
चार्टर्ड अकाउंटंट यांचे पुत्र असलेले युसूफ जन्मत:च दृष्टिहीन आहेत. त्यांना चार बहिणी असून २ बहिणी दृष्टिहीन आहेत. त्यांची एक बहीण साइमा सलीम २००७ मध्ये नागरी परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली दृष्टिहीन झाली. त्या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर कार्यरत आहेत. युसूफ यांची दुसरी बहीण लाहोर विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. 

बातम्या आणखी आहेत...