आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात सात वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणामध्ये एकास फाशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- पाकिस्तानात सात वर्षांच्या जैनब अन्सारीची अत्याचारानंतर निर्घृणपणे हत्या करणारा दोषी इम्रान अली यास न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. लाहोर येथील कोट लखपत तुरुंगात दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयाने शनिवारी हा निर्णय दिला. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी दीड महिन्यात पूर्ण केली.  


न्यायमूर्ती सज्जाद हुसेन यांनी ३४ वर्षीय इम्रानला दोषी ठरवले. हत्या, अपहरण, दुष्कृत्य, अनैसर्गिक कृत्य इत्यादी प्रकरणांत दोषी ठरवले आहे. मुलीचा मृतदेह कचऱ्यात टाकण्याचे कृत्य केल्याबद्दल सात वर्षांची शिक्षा आणि १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना जैनबी आई म्हणाली, दोषीला भरचौकात दगडाने ठेचून मारावे, अशी आमची इच्छा होती. दुसरीकडे इम्रान या निर्णयाला पंधरा दिवसांत वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ शकतो.  पंजाबची फॉरेन्सिक संस्था, राष्ट्रीय डेटाबेस, दहशतवाद प्रतिबंधक संस्था व लष्कराच्या इतर संस्थांच्या संयुक्त तपास मोहिमेनंतर दोषी इम्रानला अटक करण्यात आली होती. ही माेहीम १४ दिवस चालली होती. फॉरेन्सिकने संशयितांचे १००० नमुने व १५० डीएनएचा तपास केल्यानंतर अत्याचार करणाऱ्याची आेळख पटवली होती. इम्रान मुलीचा शेजारी आहे.पाकिस्तानात या अत्याचाराच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. पंजाब प्रांताच्या पोलिसांच्या निष्क्रियतेच्या विरोधात हिंसक आंदोलनही झाले होते. 

 

घटनेनंतर जनआक्रोश 
लाहोरपासून ५० किमी अंतरावरील कसूर शहरातून जैनब ५ जानेवारीपासून शाळेतून बेपत्ता झाली होती. त्या वेळी तिचे आई-वडील सौदी अरेबियाला गेले होते. ९ जानेवारीला शाहबाज खान मार्गावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एक मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. उत्तरीय अहवालात अत्याचार झाल्याची पुष्टी देण्यात आली होती. पाकिस्तानात अशा प्रकारच्या आठ आणखी घटना घडल्या होत्या. त्यात अल्पवयीन मुलींची अत्याचारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली होती.  

बातम्या आणखी आहेत...