आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीपर्यंत अब्बासी पंतप्रधानपदावर राहावेत, शहाबाज यांना पंतप्रधान केल्यास पक्षात फूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत शाहिद खाकान अब्बासी हेच देशाचे पंतप्रधान राहावेत अशी माझी इच्छा आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी केले.  

सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (नवाझ गट) वरिष्ठ नेत्यांची बुधवारी पंजाब हाऊसमध्ये बैठक झाली, त्या वेळी शरीफ यांनी पुढील निवडणुकीपर्यंत अब्बासीच पंतप्रधानपदी राहावेत, अशी इच्छा बोलून दाखवली. अब्बासी हे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि वचनबद्ध कार्यकर्ते आहेत, असे मत शरीफ यांनी व्यक्त केले. सर्व मंत्र्यांनी अब्बासींना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही शरीफ यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीत पूर्ण होत आहे. त्यानंतर निवडणूक घेण्यात येईल.  

शरीफ लाहोरमध्ये सभा घेणार होते. हे न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात असल्याचा आक्षेप काहींनी घेतला होता. त्याला उत्तर देताना शरीफ म्हणाले की, समर्थकांचे आभार मानण्यासाठी मी ग्रँड ट्रंक रोडमार्गे लाहोरला जात आहे. लाहोरमध्ये सभा घेण्याचा नवाझ शरीफ यांचा निर्णय योग्यच आहे, असे मत शाहबाज यांनी व्यक्त केेले. जनतेच्या संपर्कात राहणे हे नेत्याचे कर्तव्यच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  

पंजाबमध्ये फूट पडण्याची भीती
पनामा पेपर घोटाळा प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना गेल्या महिन्यात अपात्र ठरवले होते. त्यानंतर अब्बासी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. बंधू शाहबाज शरीफ यांच्याकडे पंतप्रधानपद सोपवण्याची शरीफ यांची इच्छा होती. शाहबाज यांची संसदेवर निवड होईपर्यंत अब्बासी हे हंगामी पंतप्रधान असतील, अशी घोषणाही शरीफ यांनी केली होती. मात्र, शाहबाज यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवले तर तेथे  समस्या निर्माण होतील, अशी भीती वाटल्याने शरीफ यांना निर्णयात बदल करावा लागला. शाहबाज यांना पंतप्रधान केल्यास पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार तयार होतील. पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर येईल. भीतीने  शरीफ यांनी अब्बासींना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.  

पीएमएल(एन)चे अध्यक्षपद शाहबाज शरीफ यांच्याकडे 
पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (नवाझ गट) अध्यक्षपदावरून नवाझ शरीफ यांना हटवण्यात यावे, असे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर आता शाहबाज शरीफ यांची पक्षाध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे. सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नेते राज जफरूल हक यांनी माध्यमांना सांगितले की, शाहबाज शरीफ हेच नवे पक्षाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील आठवड्यात लाहोरमध्ये होणाऱ्या बैठकीत त्याबाबत औपचारिक निर्णय घेण्यात येईल. कुठल्याही पदावर कोणाचीही नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार नवाझ शरीफ यांच्याकडे असले तरी प्रमुख निर्णय घेताना ते पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतात.
बातम्या आणखी आहेत...