आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asif Zardari Is In A Panic Since Ayyan Ali Arrested: Talal Chaudhry

पाकिस्तान ठप्प करण्याची आसिफ अली झरदारींची लष्कराला धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आपल्याच देशातील लष्कराला धमकी दिली आहे. आपल्याला त्रास दिल्यास पाकिस्तान स्थापन झाल्यापासून जे जनरल दोषी आहेत, त्यांची नावे सार्वजनिक केली जातील, असा इशारा त्यांनी दिला.

झरदारी म्हणाले, मी एक हाक दिल्यास कराचीपासून खैबरपर्यंत संपूर्ण देश ठप्प होईल आणि माझ्या आदेशापर्यंत अशीच स्थिती राहील. दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पती आणि पीपीपीचे अध्यक्ष झरदारी यांनी पाकिस्तानी रेंजरचे सिंधप्रमुख मेजर जनरल बिलाल अकबर यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. जनरल बिलाल यांनी कराचीमधील दहशतवाद आणि गुन्हेगारी घटना नेते, अधिकारी आणि टोळीतील साटेलोटे याचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. कराची सिंधची राजधानी असून येथे २००८ मध्ये झरदारी यांच्या पीपीचे सरकार होते. पाकिस्तानचे नवाझ शरीफ सरकार सिंधमध्ये अतिरेक्यांविरोधात लष्करी अभियान तीव्र करण्याचा विचार करत आहे.

झरदारी २००८ पासून २०१३ पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. पत्नी बेनझीर भुत्तो यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात ते मिस्टर १० परसेंट संबोधले जात होते. ते प्रत्येक सरकारी कामासाठी १० टक्के कमिशन घेत होते, असे सांगण्यात येते.

लष्कराला मदतीची इच्छा
झरदारी म्हणाले, सीमेवर भारताचे आव्हान आहे आणि "रॉ' पाकिस्तानला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, लष्कर त्यांच्याविरुद्ध अपप्रचार करत आहे.

लष्कराविरुद्ध वक्तव्य योग्य नाही : शरीफ
झरदारी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले, लष्कराविरुद्ध वक्तव्य करणे योग्य नाही. ते म्हणाले, दहशतवादाविरुद्ध लढा शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे एकजूट दाखवणे आवश्यक आहे. शरीफ म्हणाले, या मुद्द्यावर झरदारी यांच्याशी चर्चा केली जाईल.