पेशावर - पाकिस्तानमध्ये आता शिक्षकांच्या हाती बंदुका सोपवण्यात आल्या आहेत. सोमवारी वायव्य आदिवासी भागातील बाचा खान विद्यापीठातील प्राध्यापकांना बंदुका सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. इथे २० जानेवारी रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २१ जण ठार झाले हाेते. विद्यापीठ हल्ल्यानंतर २६ दिवसांनी उघडले.
विद्यापीठाचे कुलगुरू फैजल रहीम मारवात यांनी सांगितले की, कँपसमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्राध्यापकांना परवानाप्राप्त शस्त्र बाळगण्याची परवानगी असेल. मात्र, त्यांना शस्त्र लपून ठेवावे लागेल. ते वर्गात शस्त्राचे प्रदर्शन करू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांना शस्त्र आणण्याची परवानगी नाही. शस्त्रे घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना ती प्रवेशद्वारावर जमा करावी लागतील. यासाठी चार महिला प्राध्यापकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विद्यापीठाच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सुरक्षा जवानांची संख्या ५४ वरून ८४ करण्यात आली आहे. विद्यापीठाबाहेर एक मोबाइल व्हॅन तयार करण्यात आली आहे. भविष्यात दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
सध्या हल्ल्याचा धोका संपला नाही : कुलगुरू मारवात म्हणाले, सध्या हल्ल्याचा धोका संपलेला नाही. मात्र, याचा अर्थ भीतीने शैक्षणिक संस्था कायमच्या बंद केल्या जाव्यात असे नाही. दहशतवादी हल्ल्याच्या धक्क्यातून विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी विशेष मानसोपचार तुकडी निर्माण केली आहे.
लष्करी शाळेतही मुभा
पाकिस्तानमध्ये शिक्षकांना शस्त्र बाळगण्याची सवलत पहिल्यांदा देण्यात आलेली नाही. पेशावर लष्करी शाळेतील शिक्षकांना तशी परवानगी याआधीच दिली आहे. या शिक्षकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. लष्करी शाळेत २०१४ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४६ मुले ठार झाली होती. यानंतर सरकारने गेल्यावर्षी सात एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालयांत सैनिक शिक्षण सक्तीचे केले.