आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या उचापती, काश्मीरवर चर्चेसाठी उद्या मंत्रिमंडळ बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या उचापती अजूनही थांबलेल्या नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मिरातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी लाहोरमध्ये ही बैठक होणार आहे. त्यात ‘पुढील दिशा ठरवणार’ असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारतीय सुरक्षा दलाने बुऱ्हाण वनीच्या मृत्यूनंतर प्रदेशातील निष्पाप नागरिकांना चिरडण्यासाठी कारवाई केली. त्यात मोठा हिंसाचार झाला आहे. त्यातून काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलू लागली आहे. म्हणूनच भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. पाकिस्तान काश्मीरमधील जनतेच्या भावनांचा आदर करताे. त्याचबरोबर त्यांना असलेला पाठिंबाही कायम सुरू राहील, असे शरीफ यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना कळवले आहे. त्यापाठोपाठ शरीफ यांच्या आदेशानंतरच भारतीय उच्चायुक्तांना पाचारण करण्यात आले. उच्चायुक्तांसमोर हिंसाचाराबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. वास्तविक भारताने अंतर्गत मामल्यात पडू नका, असे स्पष्टपणे बजावले आहे. त्यानंतरही शरीफ यांनी निवेदन जारी करून ‘धक्का’ बसल्याचे जाहीर केले होते. एवढेच नव्हे, तर शरीफ यांनी बुधवारी काश्मीरमधील जनतेची बाजू घेताना त्यांचा आवाज कोणीही दडपू शकत नाही, असा कांगावाही केला. मंत्रिमंडळाची बैठक लाहोरमधील राज्यपालांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली आहे.
पीआेके संसदीय समितीची बैठक : पाकव्याप्त काश्मीरसंबंधी संसदीय विशेष समितीच्या बैठकीला शरीफ यांनी बुधवारी हजेरी लावली होती. त्यात त्यांनी जमात उलेमा -ए-इस्लाम फजलचे अध्यक्ष मौलाना फझलूर रहेमान यांच्याशी चर्चा केली. भारताने केलेल्या ‘मानवी हक्काच्या पायमल्ली’ बद्दल फुटीरतावाद्यांशी केलेल्या चर्चेवर रहेमान यांनी समाधान व्यक्त केले. काश्मीरमधील नेतृत्व सध्याच्या कठीण परिस्थितीत पाकिस्तानकडे आशेने पाहत आहे, असा दावा रहेमान यांनी या बैठकीत केला.
काश्मिरातील काही भागांत अद्यापही संचारबंदी
पंपोरा, कुपवाडा शहरांत सलग ५ व्या दिवशीही संचारबंदी लागू होती. त्यामुळे तणाव आहे. सुरक्षा दल व निदर्शकांत संघर्षांतील मृतांची संख्या आता ३५ वर पोहोचली आहे. बुऱ्हाण वनीच्या खात्म्यानंतर शुक्रवारी सायंकाळपासून राज्यात त्याच्या समर्थकांनी सुरक्षा दलाशी संघर्ष केला. बुधवारी आणखी सात जण मृत्युमुखी पडल्याचा दावा सुरक्षा दलाकडून करण्यात आला. मुख्यमंत्री मुफ्ती यांनी शांतता व सौहार्द कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
गिलानीला घराबाहेर पुन्हा अटक
फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शहा गिलानी यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या घराबाहेर जाण्याच्या प्रयत्ना असलेल्या गिलानींना पुन्हा ताब्यात घेण्यात आले. त्यांना अनेक दिवसांपासून त्यांच्या घरातच स्थानबद्ध केलेले आहे. सभा आयोजित करण्याचा त्यांचा इरादा होता.

३ हजार १३९ भाविकांचा जथ्था रवाना
काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रोखण्यात आलेली अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. बुधवारी ३ हजार १३९ भाविक असलेला जथ्था सुरक्षा दलाच्या निगराणीखाली देवस्थानाकडे रवाना झाला आहे. त्यात ७०० महिला व १०१ साधूंचा समावेश आहे. यात्रा गेल्या दोन दिवसांपासून रद्द करण्यात आली होती. त्यात अनेक राज्यंातील भाविकांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...