आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China, Pak Takes Responsibility Of Silence Agreement Of Afghanistan

अफगाणिस्तान शांतता कराराची पाकिस्तान, चीन ‘हमी’ घेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- तालिबान-अफगाणिस्तान यांच्यातील शांतता कराराची ‘हमी’ घेण्यास पाकिस्तान, चीनने तयारी दर्शवली आहे. प्रादेशिक शांततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या करारावर अद्याप अंतिम शिक्कामाेर्तब झालेले नाही.

७ जुलै रोजी पाकिस्तानच्या डोंगरी भागातील मुरी रिसॉर्टवर पाकिस्तान, चीन आणि अमेरिकी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिली खुली चर्चा पार पडली होती. तालिबान आणि अफगाणिस्तानच्या मध्यस्थांनी आपसातील मतभेद दूर केले पाहिजेत. दोन्ही बाजूंनी शांतता करारासाठी तयारी दर्शवण्यात आल्यास आम्हाला आणखी चालायला आवडेल, असे पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या बाजूने पाकिस्तानने पाठिंबा दर्शवला आहे; परंतु त्यासाठी चर्चेत योग्य प्रगती अपेक्षित आहे. चीनच्या परराष्ट्र विभागाकडूनदेखील त्यावर तयारी दर्शवण्यात आली आहे. शांतता करारासाठी आवश्यक असणाऱ्या चर्चेत रचनात्मक भूमिका घेण्यासाठी चीनची तयारी आहे, जेणेकरून त्यातून तोडगा निघू शकेल, असे चीनकडून सांगण्यात आले. दरम्यान, अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी लवकरच होणार आहे. ही बैठक नेमकी कोठे होणार आहे, याचा तपशील मात्र स्पष्ट होऊ शकला नाही.

मुल्ला आेमरचा संदेश ठरला सकारात्मक
तालिबानचा म्होरक्या मुल्ला आेमरने ईदच्या निमित्ताने दिलेला संदेश या शांतता चर्चेला अधिक गती देणारा ठरला आहे. आेमरने चर्चेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पाकिस्तान, चीनने शांतता कराराची हमी घेण्याची तयारी दर्शवली आहे.
अमेरिका-पाकिस्तानमध्ये प्रादेशिक स्थैर्यावर चर्चा
वॉशिंग्टन | दक्षिण आशियाच्या स्थैर्यासाठी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात उच्चस्तरीय पातळीवर चर्चा झाली. परस्परांमध्ये सहकार्य वाढवून आर्थिक विकास साधण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. एनएसएच्या सुझान राइस आणि पाकिस्तानचे तारिक फातेमी यांच्यात मंगळवारी बैठक झाली. ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. बैठकीला पाकिस्तानचे राजदूत जलील अब्बास जिलानी यांचीही उपस्थिती होती.

आयएसच्या विरोधात तालिबानी प्यादा ?
अगोदर कट्टरवादातून िहंसाचार घडवणाऱ्या तालिबानने चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी दर्शवली आहे. तालिबानने गेल्या दशकभरात अफगाणिस्तान भागात शेकडो लोकांचे प्राण घेतले. त्यात एकट्या ब्रिटिश फौजेतील सुमारे साडेचारशे सैनिकांचा समावेश आहे. सध्याही ब्रिटनचे सुमारे १० हजार, तर अमेरिकेचे १५ हजार जवान तैनात आहेत. तालिबानसोबतची चर्चा सुफळ संपूर्ण ठरल्यास त्या संघटनेचा वापर इस्लामिक स्टेटेच्या विरोधात करण्याची योजना आहे. ती कितपत योग्य ठरेल, यावर जाणकारांत एकमत नाही.