आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिनपिंग पाकिस्तानात; ५० अब्ज डॉलरचे करार शक्य, भारतासाठी ठरू शकते डोकेदुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सोमवारी "भाऊ' आणि "सुख-दु:खातील सोबती' म्हणजे पाकिस्तानच्या पहिल्या सरकारी दौऱ्यावर इस्लामाबादला पोहोचले. सीमेत प्रवेश करताच जिनपिंग यांच्या विमानाला पाकिस्तानी हवाई दलाच्या ८ जेएफ १७ लढाऊ जातीच्या विमानांनी सलामी देत सन्मानासह राजधानीत आणले. या विमानाची निर्मिती चीन आणि पाकिस्तानच्या सहकार्यातून झाली आहे.

कडक सुरक्षा व्यवस्थेत मित्र देशाचे सर्वेसर्वा आणि त्यांची पत्नी पेंग लियूआन यांचे इस्लामाबादच्या नूर खान विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन, पंतप्रधान नवाझ शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ तसेच शरीफ मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. जिनपिंग यांच्या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये जवळपास ५० अब्ज डॉलरच्या (साधारण ३,११८ अब्ज रुपये) चीनला पाकिस्तानशी जोडणा-या "आर्थिक क्षेत्र योजने'वर स्वाक्षरी होण्याची आशा आहे. याशिवाय दोन दिवसांच्या या दौ-यात आणखी करार होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने दोन्ही देशांतील संबंध बळकट होतील, असे मानले जाते.

स्वागत कसे असते ते भारताला दाखवणार
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये त्यांचे स्वागत केले होते. ते त्यांच्यासोबत झोपाळ्यावर बसले होते आणि साबरमती किनाऱ्यावर फिरले होते. जिनपिंग यांच्या स्वागत समारंभामध्ये आपण भारताच्या मागे नाही हे दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. जिनपिंग यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान-ए-पाकिस्तान दिला जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी देणार आहेत. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. विमानतळावर राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, लष्करप्रमुख, सर्व मंत्री उपस्थित होते. त्यांना २१ ताेफांची सलामी देण्यात आली. रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्यावर "पाकिस्तान-चीन दोस्ती जिंदाबाद' असे लिहिले होते. मंगळवारी जिनपिंग पाकिस्तान संसदेत भाषण करणार आहेत. यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

आर्थिक क्षेत्रात पीओके समाविष्ट
चीन-पाकिस्तान यांच्यादरम्यान होणाऱ्या करारांत वेगळे आर्थिक क्षेत्र म्हणून पाकव्याप्त काश्मीरचा समावेश असणार आहे. भारताच्या तीव्र विरोधानंतरही चीन या योजनेला चालना देत आहे. या योजनेअंतर्गत चीनचे अविकसित पश्चिम भागाला पाकिस्तानच्या ग्वादार बंदराशी जोडले जाईल. या क्षेत्रामध्ये रस्ते, रेल्वे, व्यावसायिक क्षेत्र, ऊर्जा प्रकल्प आणि पेट्रोलियम पाइपलाइन नेटवर्क बनवले जाईल. पाकिस्तानचे योजना व विकासमंत्री एहसान इक्बाल यांच्या म्हणण्यानुसार, ही एकच योजना नाही. त्यात ऊर्जानिर्मिती, पायाभूत सुविधा विकास व व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित योजनांचा समावेश आहे. प्रारंभी वीजनिर्मितीवर लक्ष दिले जाईल. काही योजना ३ वर्षांत पूर्ण होतील. त्यातून जवळपास १०,४०० मेगावॅट वीजनिर्मिती होईल.

१९७९ नंतर मोठी संपर्क योजना
आर्थिक क्षेत्र योजनेस १९७९ नंतर सर्वात काराकोरम हायवेनंतर दोन्ही देशांतील सर्वात मोठी संपर्क योजना संबोधले जात आहे. ही योजना पश्चिम आशियातून तेल-गॅस आयात करण्याचा मार्ग लहान करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग आहे.

चीन आठ पाणबुड्या देणार
जिनपिंग यांच्या या दौऱ्यादरम्यान चीन पाकिस्तानला आठ अत्याधुनिक पाणबुड्या देण्याच्या करारावर स्वाक्षरी करणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या पाणबुड्यांचा ताफा दुपटीपेक्षा अधिक होईल. चीनने म्हटले की, पाकिस्तानला पायाभूत सुविधा आणि ऊर्जेसाठी लागणारा मोठा निधीही दिला जाईल.