आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संयमाची परीक्षा पाहू नका, काश्मीरचा प्रश्न सोडवा : माजी पाक लष्करप्रमुख राहिल शरीफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद : भारताने गेल्या काही दिवसांत सीमेवर घेतलेली ‘आक्रमक भूमिका’ चुकीची असल्याचा इशारा देतानाच लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी जाता-जाता काश्मीर राग पुन्हा आळवला. काश्मीरची समस्या सोडवा. अन्यथा दक्षिण आशियात शांतता नांदणार नाही, असे शरीफ यांनी म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी ५७ वर्षीय कमर जावेद बाजवा यांनी राहिल शरीफ यांच्याकडून लष्कर प्रमुखपदाची सूत्रे घेतली.

रावळपिंडीतील सैन्याच्या हॉकी स्टेडियमवर आयोजित एका समारंभात बाजवा यांनी देशाच्या लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. या प्रसंगी राहिल अखेरचे भाषण करताना म्हणाले, भारताने दहशतवादाला खतपाणी घातले आहे. काश्मीरमध्ये भारताची लष्करी आक्रमक कारवाई सुरू आहे. हा संपूर्ण प्रदेशासाठी मोठा धोका आहे. आम्ही संयमाने राहतो. या धोरणाला कमकुवत समजू नये. दक्षिण आशियात शांतता नांदावी, असे वाटत असल्यास काश्मीरची समस्या सोडवण्यात यायला हवी. त्या शिवाय शांतता नांदू शकणार नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, राहिल शरीफ यांनी या वर्षी जानेवारीत कार्यकाळ वाढवून मागणार नसल्याचे स्पष्ट केले होते. वास्तविक नवाझ शरीफ यांचे सरकार त्यांना मुदत वाढवून देण्यास तयार होते, असे सांगण्यात येते. मात्र राहिल यांनी त्यास नकार दिला.

बलुच रेजिमेंटची जबाबदारी होती
बाजवा यांनी अनेक वर्षे बलुच रेजिमेंटचे प्रमुखपद सांभाळले आहे. व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचे काम त्यांनी सांभाळले आहे. त्यामुळे सरकारला आगामी काळात भारतावर दहशतवादी हल्ले घडवणे सोपे होणार आहे. त्यासाठीच लष्करप्रमुखपदासाठी अनेक दिग्गज दावेदार असतानाही बाजवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तणाव लवकरच निवळेल
व्याप्त काश्मीरमधील तणाव लवकरच निवळेल. प्रदेशातील परिस्थिती नियंत्रणात येईल, असे आश्वासन पाकिस्तानचे नूतन लष्करप्रमुख बाजवा यांनी दिले आहे. राहिल शरीफ यांच्याकडून सूत्रे स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्याची जाणीव मला आहे, असे बाजवा यांनी या वेळी सांगितले. पाकिस्तानी सैन्याचे धैर्य उंचावण्याचे आव्हान आता बाजवा यांच्यासमोर आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानी सैन्याचे धैर्य खचल्याचे बोलले जाते. पदभार स्वीकारण्याच्या समारंभाला सैन्यातील उच्चाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...