आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Female Afghani Pilot After Fall Of Taliban

तालिबान्यांना झुगारून तरुणी हवाई दलात, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाकडून गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - पाच वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातील महिलांची स्थिती अत्यंत दयनीय होती. महिला बुरख्याशिवाय घराबाहेर पडू शकत नव्हत्या. मात्र, १८ वर्षीय निलोफर रहेमानीचे वैमानिक होण्याचे स्वप्न होते. तिने हे स्वप्न अगदी बालपणापासून जोपासले होते. खडतर परिस्थितीतही तिने अफगाण वायुदलात स्थान पटकावले. दहशतवादी गटांनी व नातलगांनीही तिला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. २३ वर्षीय निलोफरने नकळत इतिहास घडवला.
अफगाणिस्तानच्या इतिहासातील ती पहिली फिक्स-विंग एव्हीएटर ठरली आहे.तालिबान्यांचे वर्चस्व संपुष्टात आल्यानंतर २००१ मध्ये अफगाण सैन्यातील पहिली महिला वैमानिक म्हणून आज तिची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात तिला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने इंटरनॅशनल वुमेन ऑफ करेज पुरस्काराने गौरवले.
विमान प्रशिक्षण अकादमीत प्रवेशासाठी इंग्रजी शिकली : विमान प्रशिक्षण अकादमीत प्रवेश घेण्यापूर्वी १ वर्ष केवळ इंग्रजी शिकल्याचे कॅप्टन निलोफरने सांगितले. वर्ष २०१० मध्ये अफगाण वायुदलात ऑफिसर ट्रेनिंगसाठी तिची निवड झाली. जुलै २०१२ मध्ये सेकंड लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली. सेसना-१८२ चे पहिले उड्डाण अविस्मरणीय असल्याचे तिने सांगितले. मोठे विमान उडवण्याचे स्वप्न असल्याने अॅडव्हान्स फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. आता लवकरच ती सी-२०८ कार्गो विमान उडवणार आहे.
आदेशांकडे दुर्लक्ष करून जवानांचे जीव वाचवले
पारंपरिक संकेतांप्रमाणे महिलांना मृत वा जखमी सैनिकांना वाहून नेण्याची परवानगी नाही. मात्र, एका मिशनदरम्यान जखमी सैनिकांना निलोफरने नियमांची पर्वा न करता वाचवले. त्यांना रुग्णालयात हलवले.
फ्लाइट इन्स्ट्रक्टर म्हणून काम करण्याची इच्छा
कॅप्टन निलोफर रहेमानीची फ्लाइट इन्स्ट्रक्टर होण्याची इच्छा आहे. इतर महिलांना या क्षेत्रात येण्यास प्रेरित करण्यासाठी हे काम करायचे आहे. तालिबान्यांचा विरोध झुगारून कायमस्वरूपी सैन्यात कार्य करण्याचा निश्चय आहे. प्रत्येकीने स्वत:ला महिला म्हणून नव्हे माणूस पाहावे, आत्मविश्वास बाळगावा, असा संदेश निलोफरने दिलाय.