आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा वर्षांनंतर गीताला मिळाला बजरंगी भाईजान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत गेलेल्या आणि पाकच्या पंजाब रेंजर्सना सापडलेल्या गीता या मूकबधिर भारतीय मुलीला अखेर तिचा बजरंगी भाईजान मिळाला. गेली तब्बल १५ वर्षे ती पाकमध्येच अडकून पडली होती. गीताची कहाणी मीडियात झळकताच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त टी. सी. ए. राघवन यांना कराचीला जाऊन तिची भेट घेण्याचे आणि तिला मायदेशी परत आणून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मायदेशी परतण्याच्या तिच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पंधरा वर्षे चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेली गीता सध्या कराचीजवळ एका समाजसेवकाकडे राहते. पंजाब रेंजर्सनी तिला इधी प्रतिष्ठानच्या स्वाधीन केले होते. लाहोरमधील इधी केंद्रात काही दिवस राहिल्यानंतर तिला पाकिस्तानची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिल्कीस इधी यांच्याकडे ठेवण्यात आले. त्यांनी तिला साजेसे नाव ठेवले गीता ! सध्या २३ वर्षांची असलेली गीता आता मोबाइलवर भारताचा नकाशा ओळखू शकते. परंतु इधीच्या कर्मचाऱ्यांना ती इतर काहीच माहिती सांगू शकली नाही. भारताच्या नकाशात ती झारखंड आणि तेलंगणवर बोट ठेवून तिच्या भूतकाळाविषयी काहीतरी सांगू इच्छिते.

एका भारतीय पत्रकारासह अन्य पत्रकारांनीही तिची मुलाखत घेतली, परंतु कोणालाही तिच्या कुटुंबाचा ठावठिकाणा शोधता आला नाही. इधी प्रतिष्ठानने तिला पाकिस्तानमध्ये हिंदू मुलाबरोबर नवीन जीवनास सुरुवात करण्याची सूचना दिली खरी, परंतु तिने त्याला नकार दिला आणि घरी परतल्यावर लग्न करणार असल्याचे तिने स्पष्ट केले. गीताच्या लिहिण्यात वारंवार ‘१९३’ येतो. पाकिस्तानमधील तिच्या कुटुंबीयांना हा तिच्या घराचा क्रमांक असावा असे वाटते.
रुपेरी पडद्यावर यशस्वी ठरलेल्या सलमानखानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामुळे कार्यकर्ते गीताला तिच्या भारतातील कुटुंबीयांकडे परत पाठवण्याच्या कामाला लागले आहेत. तीन वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील मानवी हक्क कार्यकर्ते अन्सार बर्ने यांनी त्यांच्या भारत भेटीत गीताचा मुद्दा उपस्थित केला होता. गीतासाठी त्यांनी फेसबुकवर कॅम्पेनही सुरू केली आहे.
सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’मध्ये एक मुकी पाकिस्तानी मुलगी भारतात हरवते आणि तिला परतीचे कुठलेच मार्ग सापडत नाही. एक भारतीय माणूस तिला पाकिस्तानमधील तिच्या कुटुंबीयांकडे परत पाठवण्याचा विडा उचलतो, अशी कथा आहे. मूकबधिर गीतालाही पंधरा वर्षांनंतर तिचा बजरंगी भाईजान मिळाला आहे.

सोमवारी सायंकाळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने राघवन, त्यांची पत्नी रंजना आणि अन्य भारतीय अधिकाऱ्यांना गीताची भेट घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे तिच्या मायदेशी परतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...