आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाऊस; दुर्घटनेत १०० मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गिलगिट-बाल्टिस्तान भागात पावसामुळे घडलेल्या घटनांत सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला. त्यात दरडी कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरचा जगाशी संपर्क तुटला आहे.

गेल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. सहा दिवसांनंतरही पाऊस सुरू राहिल्याने उत्तरेकडील भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. खैबर पख्तुनख्वा भागालाही पावसाने तडाखा दिला आहे. चीनच्या शिनजियांगला जोडणारा काराकोरम महामार्ग, गिलगिट आणि अबोटाबाद मार्गावर पाणीच पाणी झाले आहे. पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून ५० हून अधिक परदेशी पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेक भागात आठवड्यापासून खाद्यपदार्थांचा तुटवडा जाणवत आहे. इंधनाचीही कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्येत वाढ झाली आहे. २०० मीटर लांबीचा कोहिस्तानमधील पूल वाहून गेला आहे. ही घटना दरड कोसळून घडली. त्यात किमान २० जणांचा मृत्यू झाला. कांडियामध्ये खडक अंगावर पडल्याने किमान २५ जणांचा मृत्यू झाला. त्यात १३ महिलांचा
समावेश आहे. शेकडो घरे वाहून गेली आहेत. कोहिस्तान, डायमर, नगर, हुंझासारख्या भागात परदेशी पर्यटक अडकल्याचे सांगण्यात आले. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकाने बंद पडल्याने पर्यटकांसह नागरिक हैराण झाले आहेत. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. हजारो नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. सरकारकडून काय मदत मिळेल, याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, असे एका स्थानिक नागरिकाने म्हटले आहे.

अगोदर अनास्था, आठवड्यानंतर मदत
गेल्या आठ दिवसांपासून प्रदेशातील जनतेला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गिलगिट-बाल्टिस्तानचे मंत्री मोहंमद इक्बाल यांनी प्रदेशात नैसर्गिक आपत्ती असल्याचे मान्य केले. परंतु येथील जनतेपर्यंत तातडीने मदत पोहोचली नसल्याबद्दल काहीही सांगितले नाही. आठवड्यानंतर मात्र पाकिस्तानला कळवळा आला आहे. पूर आणि पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराची मदत घेतली जाईल. त्यांना तशी विनंती करण्यात आली आहे. ते लवकरच गरजूंना आणि परदेशी पर्यटकांना अगोदर बाहेर काढतील, असे इक्बाल यांनी सांगितले.

अफगाणिस्तानजवळ १२ अतिरेक्यांचा खात्मा
पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील धुमश्चक्रीत गुरुवारी १२ अतिरेक्यांचा खात्मा झाला. अफगाणजवळील सुरक्षा छावणीजवळ ही धुमश्चक्री उडाली होती. अफगाणिस्तानकडून ५० बंडखोर पाकिस्तानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी दोन्ही बाजूने गोळीबार झाला. अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यात २ हजार २५० किलोमीटरची सरहद्द आहे. दररोज सीमेवर घुसखोरीच्या घटना घडतात. आतापर्यंत शेकडो तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून अफगाणिस्तानात घुसण्यासाठी याच सीमेचा वापर केला होता.