आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या नाराजीमुळे लखवी पुन्हा तुरुंगातच, सुटकेच्या अगोदर लखवीच्या अटकेचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर/ इस्लामाबाद - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या झकी-उर-रहेमान लखवी तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही. भारताच्या तीव्र नाराजीनंतर पंजाबच्या गृह खात्याने त्याला सुटकेपूर्वीच पुन्हा अटक केली आहे. सार्वजनिक शांतता भंग होऊ नये म्हणून लखवीला पुन्हा ३० दिवसांसाठी ताब्यात घेतले आहे.
लखवी सध्या रावळपिंडीच्या आडियाला तुरुंगात आहे. तेथेच त्याला आणखी एक महिना ठेवण्यात येईल, असे पंजाब सरकारच्या अधिका-याने शनिवारी सांगितले. त्याअगोदर शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने लखवीला ताब्यात घेणे बेकायदा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर लखवी कोणत्याही परिस्थितीत तुरुंगाच्या बाहेर येता कामा नये, असे स्पष्ट केले होते. दुसरीकडे लखवीचे वकील रिझवान अब्बासी म्हणाले, नवीन आदेशाला आम्ही सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान देऊ. दरम्यान, लखवीसह इतर सहा जणांवर मुंबई हल्ल्याचा कट रचण्याचा आरोप आहे. अब्दुल वाजिद, मझर इक्बाल, हमद अमीन
सादिक, शाहिद जामील रियाझ, जामील अहमद, युनूस अंजुम या प्रकरणात दोषी ठरले आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या हल्ल्यात १६६ नागरिकांना प्राण गमवावे लागले होते.

अगोदर जामीन
दहशतवाद प्रतिबंधक विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी लखवीला जामीन मंजूर केला होता, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून आदेशाच्या दुस-याच दिवशी त्यास पुन्हा अटक झाली होती.

कोर्टाचा अवमान
लखवीच्या अटकेला उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवले होते. त्यानंतरही गृह खात्याने लखवीला पुन्हा ताब्यात घेतले आहे. ही कृती सरळ कोर्टाची बेअदबी करणारी आहे. पंजाब सरकारने कोर्टाचा अवमान केला आहे. म्हणूनच गृह खात्याचा आदेशच बेकायदा ठरतो, असे अब्बासी यांचे म्हणणे आहे.

ठोस पुरावा नसल्याचा दावा
लखवीची सुटका झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा सरकारने केला आहे. परंतु सरकारकडे तसे कोणतेही पुरावे नाहीत. म्हणूनच त्याच्यावर फौजदारी गुन्हे नसल्यास लखवीची तत्काळ सुटका करण्यात यायला हवी, असे एका वरिष्ठ वकिलाने म्हटले आहे.

लखवीला न्यायासनापुढे खेचून आणा : अमेरिका
वॉशिंग्टन | मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार लखवीला न्यायासनापुढे खेचून आणा, असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानने या हल्ल्यातील दोषीला कोर्टापुढे आणण्याचे आश्वासन दिले होते. आपल्या आश्वासनाला जागून पाकिस्तानने त्याला कोर्टापुढे आणावे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करत आहोत. सध्या तो तुरुंगातच राहणार
आहे.