आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय विवाहितेचा पाक सासरकडून छळ; भारतीय दूतावासात आश्रयाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- भारतीय कन्या उज्मा आणि पाकिस्तानी युवक ताहिर यांनी ३ मे रोजी केलेल्या लग्नाने आता वेगळेच वळण घेतले आहे. बंदुकीचा धाक दाखवून ताहिर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याला लग्न करण्यास भाग पाडल्याचा आरोप उज्माने केला आहे. त्यांनी पासपोर्टसह अन्य महत्त्वाची कागदपत्रेही हिसकावून घेतली असून आता मला त्यांच्या घरी जायचे नाही. जोपर्यंत माझी मायदेशी रवानगी केली जात नाही तोपर्यंत मी इस्लामाबादच्या भारतीय दूतावासातच राहील, असा हट्ट उज्माने धरला आहे. दरम्यान, भारतीय दूतावास याप्रकरणी पाकिस्तानी परराष्ट्र खाते आणि उज्माच्या भारतातील नातेवाइकांशी चर्चा करत आहे.  

उज्मा आणि ताहिरची सुमारे ८ महिन्यांपूर्वी मलेशियामध्ये भेट झाली होती. त्यानंतर दोघांत प्रेम जडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उज्मा १ मे रोजी वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात पोहोचली आणि ३ मे रोज विवाहबद्ध झाली. पण लग्नाच्या दोनच दिवसांत सासरच्या मंडळींकडून आपला छळ सुरू झाल्याचा उज्माचा आरोप आहे. त्यानुसार तिने ५ मे रोजी पाकिस्तानच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. तिने न्यायालयात सांगितले की, मी पाकिस्तानात लग्न करण्यासाठी आले नव्हते. 

ताहिरचे लग्न झालेले असून त्याला पूर्वीच्या पत्नीकडून चार मुलेही आहेत. पण ताहिरच्या कुटुंबीयांनी बंदुकीचा धाक दाखवत मला विवाहास बाध्य केले. त्यानंतरही त्यांनी मला मारहाण केली. माझी सर्व कागदपत्रे आणि सर्व सामान त्यांनी हिसकावून घेतले. त्यामुळे मला आता त्यांच्याकडे राहायचे नाही असे उज्माने सांगितले आहे. 

भारतीय दूतावासाकडून प्रयत्न सुरू  
उज्माने तिच्यासोबत घडलेला प्रसंग इस्लामाबादस्थित भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांसमोर कथन केला. व्हिसाच्या बहाण्याने ती ताहिरलाही दूतावासात घेऊन आली होती. अधिकाऱ्यांच्या मते, उज्मा या प्रकरणामुळे प्रचंड घाबरलेली असून तिला आता पाकिस्तानात राहायचे नाही. जोपर्यंत आपल्याला मायदेशी परत पाठवले जाणार नाही तोपर्यंत भारतीय दूतावासाच्या बाहेर पायही ठेवणार नाही, असे तिचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...