इस्लामाबाद- पाकिस्तानी न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्याची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. या वेळी न्यायाधीशांच्या सुटीची सबब सांगण्यात आली. याप्रकरणी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख झकी-उर-रहमान लखवीसह सात दहशतवादी आरोपी आहेत.
दहशतवादविरोधी न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केल्याचे सांगितले. न्यायाधीश सुटीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार लखवीला १० एप्रिल रोजी जामिनावर मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्र प्रतिबंधक समितीसमोर हा मुद्दा उपस्थित केला. पाकने यावर स्पष्टीकरण द्यावे, असा प्रस्ताव भारताने ठेवला होता. चीनने भारताविरुद्ध भूमिका घेत ठोस पुरावे नसल्याचे म्हटले व संयुक्त राष्ट्र समितीसमोर नकाराधिकाराचा वापर केला.
संयुक्त राष्ट्र प्रतिबंधक समितीने लखवीला दहशतवादी घोषित केले आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याची सुनावणी यापूर्वी १५ जुलै रोजी झाली होती. जीविताला धोका असल्याचे कारण दाखवत या वेळी लखवी अनुपस्थित होता. पुढील सुनावणी २७ जुलै रोजी आहे. हा खटला २००९ पासून सुरू आहे. न्यायाधीशाची बदली, वकील नसणे, न्यायाधीशांची सुटी अशा कारणास्तव सुनावणी यापूर्वीही टाळण्यात आली होती.