आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कव्वालीचे सुपरस्टार अमजद साबरींची गोळ्या घालून हत्या, कव्वालीनेच घेतला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानचे प्रसिद्ध सुफी गायक तथा कव्वाल अमजद साबरी (४५) यांची बुधवारी अज्ञात हल्लेखोरांनी छातीत व डोक्यात गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्या सहकाऱ्याचाही या घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच मुले आहेत. दरम्यान, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या हकिमुल्लाह मेहसूद गटाचा प्रवक्ता क्वारी सैफुल्लाह मेहसूद याने या घटनेची जबाबदारी घेतली आहे.

साबरी बुधवारी आपल्या सहकाऱ्यासोबत कारने कराचीजवळील लिकादाबादकडे जात होते. त्याचवेळी २ हल्लेखोर मोटारसायकलवरून येऊन त्यांनी साबरी यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यात साबरी यांच्या छातीवर आणि डोक्यात गोळ्या लागल्या. सहकारीही गोळीबारात रक्तबंबाळ झाला होता. दोघांनाही गंभीर अवस्थेत अब्बासी शाहिद रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
भारतीय उपखंडात साबरी घराण्याची लोकप्रियता होती. प्रसिद्ध कव्वाल गुलाम फरिद साबरी यांचे अमजद हे पुत्र होत. साबरी यांनी सुफी गायनातून लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. कव्वालीचा सुपरस्टार म्हणून अमजद साबरी यांची युरोप, अमेरिकेत आेळख निर्माण झाली होती. कार्यक्रमानिमित्त साबरी नेहमी युरोप, अमेरिकेचा दौरा करायचे. त्यांनी कव्वालीला नवीन साज चढवला. त्यामुळे त्यांच्या कव्वालीतून आगळा नजराणा मिळे. दरम्यान, हे दहशतवादी कृत्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ईश्वरनिंदा आणि अमजद साबरी
2014 मध्ये सकाळी कव्वाली सादर केल्याने दोन टीव्ही वाहिन्या आणि अमजद साबरी यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. साबरी यांनी सादर केलेल्या कव्वालीत काही धार्मिक नावांचा समावेश होता. पाकिस्तानमधील कायद्यानुसार हा गुन्हा आहे.
डोक्यात गेलेल्या गोळीने घेतला जीव
याबाबत डीआयजी मुश्ताक मेहर यांनी सांगितले, की येथील लियाकताबाद परिसरात दोन दुचाकीस्वारांनी अहमद साबरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी 30 बोअरच्या पिस्तुलातून एकूण पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी साबरी यांच्या डोक्यात गेली. त्यातच साबरी यांचा मृत्यू झाला.
‘भर दो झोली मेरी’, ‘ताजदार -ए- हरम’ : अमजद साबरी यांची भर दो झोली मेरी, ताजदार-ए-हरम, मेरा कोई नही है तेरे सिवा यासारखी गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. कव्वालीप्रेमींच्या आेठांवर अशा अनेक कव्वाली सहजपणे येऊ लागतात. कव्वालीच्या लोकप्रियतेत साबरी घराण्याचे योगदान मोठे मानले जाते.

कराचीतील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा
सिंध उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या मुलाचे अलीकडेच अपहरण झाले. त्या घटनेच्या दोन दिवसांनंतर कराचीत साबरी यांची हत्या झाली आहे. याच आठवड्यात अहमदी समुदायाच्या एका डॉक्टरची क्लिनिकमध्ये घुसून हत्या झाली होती. अल्पसंख्याक समुदायाला त्यातून लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर व आर्थिक राजधानी असलेल्या कराचीतील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. साबरी यांची हत्या म्हणजे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका िवरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. कराचीत कोणीही सुरक्षित नाही.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कारवर असा केला गोळीबार,
अखेरच्‍या स्‍लाइडवर घटनास्‍थळावरील व्‍हिडियो...
त्‍यापुढे पाहा, 'भर दो झोली'सह इतर लोकप्रिय गीतांचे व्‍हिडियो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...