रावळपिंडी - पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी त्यांच्या सैन्याचे कौतूक करताना म्हटले आहे, की जगातील सर्वात अनुभवी आणि उत्कृष्ट सैनिक पाक आर्मीत आहेत. कोणत्याही युद्धाला तोंड देण्यास पाकिस्तानी लष्कर सज्ज असल्याचे ते म्हणाले. तसेच ते म्हणाले, 'काश्मीर प्रश्न सोडविल्याशिवाय शांतता नांदू शकत नाही. पाकिस्तानसाठी तो अर्धवट मुद्दा आहे.' भारत-पाकिस्तानच्या 1965 च्या युद्धाला 50 वर्ष झाल्यानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. पाकिस्तानने हे युद्ध जिंकल्याचा दावा केला आहे.
काश्मीरवर चिथावणीखोर वक्तव्य
रावळपिंडी येथील आर्मी हेडकॉर्टरमध्ये आयोजित कार्यक्रमात शेकडो लष्करी अधिकारी आणि सर्वसामान्य जनतेसमोर शरीफ म्हणाले, 'काश्मीर मुद्दा सोडविल्याशिवाय या भागात शांतता येणार नाही हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे. काश्मीरी लोकांच्या इच्छेनूसार हा मुद्दा सोडवला पाहिजे. सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. देशातील इतर ठिकाणीही तसे करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.' ते म्हणाले, 'काश्मीर मुद्दा आता जास्त दिवस भिजत पडू देता कामा नये.'
आणखी काय म्हणाले शरीफ ?
शरीफ म्हणाले, 'पाकिस्तानी लष्कर देशांतर्गत आणि बाहेरुन होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. आमचे सैन्य जगातील कोणत्याही शक्तींना चोख प्रत्युत्तर देऊ शकते. मग तो हल्ला मोठा असेल नाही तर छोटा. शत्रुला त्याची किंमत मोजावी लागेल.'
शरीफ यांनी यावेळी अनेक विषयांना हात घातला. त्यांनी दहशतवाद, चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर आणि अफगाणिस्तान मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. मात्र, या भाषणात त्यांनी कुठेही भारताचा उल्लेख केला नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलिकडून रोज गोळीबार सुरु आहे. काही दिवासंपूर्वी भारतीय लष्कर प्रमुख दलबीरसिंह सुहाग यांनी पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचे म्हटले होते. त्यासोबतच ते म्हणाले होते, की सीमेवर कधीही छोटी-मोठी लढाई होईल असे वातावरण आहे. त्यामुळे आम्ही कायम तयार असतो. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरीफ यांच्या भाषणाला महत्त्व आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पाकिस्तानात आर्मी डे निमीत्त शस्त्रांचे प्रदर्शन