इस्लामाबाद - पाकिस्तानने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. कट्टरवादी विचारांच्या साह्याने नरेंद्र मोदी वेगाने शिखरावर चढू शकले. तिच मानसिकता आता त्यांचा ऱ्हास करू लागली आहे, अशी टीका संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे.
भारत वातावरण खराब करू लागला आहे. दोन्ही शेजाऱ्यांतील दरी देखील त्यातून वाढू लागली आहे, असा दावा त्यांनी केला. पाकिस्तान आतापर्यंत केवळ काश्मिरच्या मुद्द्यावरून भारताला
विरोध करत आला आहे. रेडिआे पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार ख्वाजा आसिफ म्हणाले, भारताने चांगली नियत दाखवावी. मग पाकिस्तानही चांगली मैत्री निभावेल. द्विपक्षीय संबंधांना भारताने अगदी खालच्या स्तरावर नेले आहे. भारताकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला निपटण्यास पाकिस्तान सक्षम आहे. परंतु शांतता कायम ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याची गरजही आसिफ यांनी व्यक्त केली आहे.