आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाझ यांची पत्नी कुलसुम यांचा लाहोर पोटनिवडणुकीत विजय; शरीफ यांच्या रिक्त जागेवर यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या नवाझ शरीफ यांच्या पत्नीला लाहोर पोटनिवडणुकीत विजय मिळाला. नवाझ यांना अपात्र ठरवल्यानंतर लाहोर मतदारसंघातील त्यांची जागा रिक्त झाली होती. आता त्याच ठिकाणी पत्नी कुलसुम शरीफ निवडून आल्या आहेत. कुलसुम यांनी इम्रान खानचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफच्या उमेदवार यास्मीन राशीद यांना १३ हजार मताधिक्याने पराभूत केले. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, कुलसुम नवाझ यांना ५९ हजार ४१३ मते मिळाली. राशीद यांना ४६ हजार १४५ मते मिळाली आहेत. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफिज सईदचा पक्ष मिली मुस्लिम लीगच्या शेख याकूब यांना ४ हजार मतांवर समाधान मानावे लागले. नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अपात्र पंतप्रधान ठरवले होते. त्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.  

२०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत शरीफ कुटुंबाचे समर्थन घटले आहे. शरीफ यांनी त्या वेळी राशीद यांना  ४१ हजार मताधिक्याने पराभूत केले होते. नवाझ शरीफ हे पंतप्रधानपदावरून २८ जुलै रोजी पायउतार झाले होते. त्यानंतर लाहोर येथील  जागा रिक्त होती.  

कन्या मरियमच्या हाती प्रचाराची सूत्रे : कुलसुम नवाझ यांच्यावर लंडनच्या रुग्णालयात कर्करोगावरील उपचार झाले आहेत. त्या अद्यापही लंडनमध्येच आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची कन्या मरियम नवाझ यांनी निवडणूक प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती. निवडणुकीच्या निकालानंतर मरियम म्हणाल्या, ‘जनतेने नवाझ शरीफ यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या कटकारस्थानांना फेटाळले आहे. जनतेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडेदेखील पाठ फिरवली आहे.’  
 
पाकिस्तानात राजकीय अस्थैर्य नाही : अब्बासी  
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांनी म्हटले आहे की, पाकमध्ये  कोणतेही राजकीय अस्थैर्य नाही. सरकारविरुद्ध रचले जाणारे कटकारस्थान काही नवी बाब नाही. अशा कारस्थानांचा मुकाबला करण्यास सरकार सक्षम आहे. अब्बासी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्यासाठी येथे आले आहेत. शरीफ-अब्बासी यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ, अर्थमंत्री इशाक दार आणि नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष  अयाज सादिकदेखील उपस्थित होते. अब्बासींनी अमेरिकेला इशारा दिला की,पाकशी वितुष्ट घेऊन अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैन्य अभियान, क्षेत्रीय व्यापारि हितसंबंधांना जोखमीत टाकले आहे. अमेरिकेने पाक धोरणात बदल करणे गरजेचे आहे. 
बातम्या आणखी आहेत...