लाहोर - पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी बुधवारी शिया विरोधी दहशतवादी संघटना लश्कर ए झांघवीचा म्होरक्या मलिक इशाकला चकमकीत ठार केले. या संघटनेवर पाकिस्तानात सर्वाधिक दंगली घडवल्याचा आरोप आहे.
पंजाब प्रांताचे गृहमंत्री शुजा खानजादा यांनी सांगितले की, बुधवारी पहाटे पोलिसांनी शूटआऊटमध्ये या संघटनेचा म्होरक्या इशाक मलिक आणि त्याच्या 13 समर्थकांना ठार केले. मृतांमध्ये त्याच्या दोन मुलांचाही समावेश होता.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने सांगितले की, इशाकला 25 जुलैला अटक करण्यात आली होती. पण मुजफ्फरगडमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर तो पळून गेला होता. प्रत्युत्तरात पोलिसांनी फायरिंग केले तेव्हा त्यात त्याच्या दोन मुलांसह इतर 11 दहशतवादी देखिल ठार झाले. या कारवाईत सहा पोलिस अधिकारीही जखमी झाले आहेत. मुजफ्फरगड येथील रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर मुश्ताक रसूर यांनी 14 मृतदेह मिळाल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे.