आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुल्ला ओमर ठार, अफगाणकडून दुजोरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - अफगाणिस्तानवर १९९६ ते २००१ या काळात राज्य करणारा आणि कायम अदृश्य राहून क्रूर कारवाया करणारा तालिबानचा म्होरक्या एकाक्ष (त्याला एकच डोळा होता) मुल्ला ओमर जिवंत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बीबीसीच्या एका वृत्तानुसार मुल्ला ओमर दोन-तीन वर्षांपूर्वीच मारला गेला आहे. विद्यमान अफगाण सरकार व गुप्तचरांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.

मुल्ला ओमरच्या मृृत्युबाबत तालिबान लवकरच जाहीर घोषणा करणार असल्याचेही तालिबानी प्रवक्त्याचा हवाला देऊन वृत्तात नमूद करण्यात आले आहे. नुकत्याच साज-या झालेल्या ईदच्या दिवशी तालिबान संघटनेने ओमर याचा एक संदेश जाहीर करून ७ जुलै रोजी तालिबानी गट व अफगाण सरकारदरम्यान झालेल्या चर्चेच्या पहिल्या फेरी अधिकृत असल्याचे म्हटले होते.

यापूर्वीही अफवा...: अमेरिकी फौजांनी मुल्ला ओमर याच्या नेतृत्वाखालील अफगाणमधील राजवट उलथून टाकल्यानंतरच्या काळात केलेल्या कारवाईत ओमर मारला गेल्याच्या अनेकदा बातम्या आल्या होत्या. मात्र, याला सबळ पुरावा आणि दुजोरा मिळू शकत नव्हता. यंदा मात्र अफगाण सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे.

अज्ञातवासात क्रूरकर्मा
२००१ मध्ये अफगाणमधील सत्ता अमेरिकेेने उलथून टाकल्यानंतर अोमर अज्ञातवासातच होता. याच काळात ओसामा बिन लादेन याच्या पाठीशी ओमरने शक्ती लावली. त्याच्या डोक्यावर १ कोटी अमेरिकी डॉलरचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तालिबानी दहशतवादी आणि त्यांच्या इतर नेत्यांनाही २००७ नंतर मुल्ला ओमरची काही माहिती नाही.

ओमरचे आत्मचरित्र
अफगाण तालिबानने संघटनेच्या नेतेपदी ओमरला १९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या वर्षी त्याचे ५ हजार पानांचे एक आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. यात १९८३ पासूनची त्याची कारकीर्द वर्णिली आहे. रशियन फौजांविरुद्ध १९९१ पर्यंत लढताना चार वेळा तो जखमी झाला. यातच त्याने एक डोळा गमावला होता. १९९२ मध्ये अफगाणिस्तानातील डाव्या विचारसरणीचे सरकार कोसळले आणि १९९६ मध्ये ओमर तालिबानी संघटनेचा सर्वेसर्वा झाला.