लाहोर - मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड आणि दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा म्होरक्या जकी उर रहमान लखवीला रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगातून मुक्त करण्यात आले आहे. सूत्रांनी पाकिस्तानच्या जियो टीव्ही न्यूज चॅनेलला सांगितले, की लाहोर हायकोर्टाने लखवीला ताब्यात ठेवणे बेकायदेशीर ठरवल्यानंतर गुरुवारी उशिरा रात्री त्याला सोडून देण्यात आले. मात्र, अदियाला तुरुंग प्रशासनाने त्याच्या मुक्ततेबद्दल अधिकृतरित्या माध्यमांना काहीही सांगितलेले नाही. जियो टीव्हीने दावा केला आहे, की जमात-उद-दवाचे काही सदस्य लखवीला घेण्यासाठी तुरुंगात पोहोचले होते. येथून त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे.
लखवीने त्याला बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवल्याचा आरोप करत हायकोर्टात अपील केले होते. गुरुवारी हायकोर्टाने चौथ्यांदा लखवीला बेकायदेशीर रित्या ताब्यात ठेवल्याचे म्हटले आणि त्याची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्याच्या वकीलांनी म्हटले होते, की कोर्टाच्या आदेशानंतरही त्याला परत-परत तुरुंगात ठेवले जात आहे. लखवीला 10-10 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आली आहे. गेल्या महिन्यातही इस्लामाबाद हायकोर्टाने लखवीला ताब्यात ठेवणे बेकायदेशीर असल्याचे मान्य करत त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते.