आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांना पाठीशी घालू नका; शरीफ यांचा लष्कराला आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हादरले आहेत. त्यामुळेच त्यांनी ‘प्रतिबंधित दहशतवादी गटांना पाठीशी घालू नका, त्यांच्यावर कारवाई करा,’ असा आदेश पाकिस्तानात बलशाली समजल्या जाणाऱ्या लष्कराला दिला आहे. त्याचप्रमाणे पठाणकोट हल्ल्याची चौकशी तसेच २००८ च्या मुंबई हल्ल्याची सुनावणी लवकर पूर्ण करा, असे आदेशही प्रशासनाला दिले. पाकिस्तानमधील ‘डॉन’ या आघाडीच्या वृत्तपत्राने गुरुवारी याबाबतचे वृत्त दिले.

या बैठकीत सहभागी असलेल्या एका जबाबदार व्यक्तीचा हवाला देऊन ‘डॉन’ने म्हटले आहे की, लष्कर आणि नेेते यांच्यात अनेक बैठका झाल्या. त्यानंतर शरीफ यांनी हे आदेश दिले. सरकारने लष्करी नेतृत्वाला अत्यंत थेट आणि अभूतपूर्व म्हणावा लागेल असा इशारा दिला असून प्रतिबंधित दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती मागितली आहे.

‘डॉन’च्या वृत्तानुसार, अलीकडच्या बैठकांमधील विचारमंथनानंतर द्विस्तरीय कारवाईबद्दल सहमती व्यक्त करण्यात आली. आयएसआय या गुप्तचर संघटनेचे महासंचालक रिझवान अख्तर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीर जंजुआ हे दोघे देशाच्या सर्व प्रांतांमध्ये जातील. प्रतिबंधित दहशतवादी गटांच्या विरोधात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या कामांत लष्कराच्या नेतृत्वाखालील गुप्तचर संस्था कोणताही हस्तक्षेप करणार नाहीत, असा स्पष्ट संदेशच हे दोघे देतील.

हे तर शरीफ यांचे अपयश : विरोधकांची टीका : पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ‘काही विशिष्ट लोकांना’ स्वातंत्र्य दिल्यानेच उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला. हे शरीफ यांचेच अपयश आहे, अशी टीका पीपीपीचे नेते ऐतजाज अहसान यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात केली. कोणत्याही देशात अस्थिरता नसावी असे आम्हाला वाटते. कारण त्याचा दोषही या विशिष्ट लोकांमुळेच आपल्यावर येईल, असा घरचा आहेरही त्यांनी दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर शरीफ एकाकी पडले आहेत.

शाहबाज-आयएसआयमध्ये ठिणगी
अलीकडेच एका कारवाईवरून पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ आणि आयएसआयचे महासंचालक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या शाब्दिक चकमकीनंतर शरीफ यांनी हा निर्णय घेतला आहे, असे समजते. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडत असल्याने शरीफ निराश झाले आहेत. त्यामुळेच त्यांना दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश द्यावे लागले, असे चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...