आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू पत्रकाराला पाकिस्तानमध्ये दुजाभावाची वागणूक, चौकशी सुरू : मसूद मलिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक- फोटो...)
कराची- असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (एपीपी) या सरकारी वृत्तसंस्थेतील एका हिंदू पत्रकाराला पाणी पिण्यासाठी वेगळा पेला वापरण्यास भाग पाडण्यात येत असून कार्यालयातील इतर मुस्लिम सहकारी वापरत असलेली भांडी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचा धर्म वेगळा असल्याचे समजल्यानंतर ही भेदभावाची वागणूक देण्यात येत आहे.

‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार, साहिब खान ओआद हे एपीपीमध्ये वरिष्ठ बातमीदार आहेत. त्यांची आधी इस्लामाबादमध्ये बातमीदार म्हणून नियुक्ती झाली होती. नंतर त्यांची हैदराबादला आणि या वर्षी कराचीला बदली झाली. एक दिवस ओआद यांचा धाकटा मुलगा राजकुमार कार्यालयात आला होता, त्या वेळी ते हिंदू असल्याचे सर्वांना समजले आणि त्यानंतर ही भेदभावाची वागणूक देण्यास सुरुवात झाली. साहिब खान यांनी सांगितले की, ‘माझ्या नावात खान हा शब्द असल्याने मी मुस्लिमच आहे, असे सर्वांना वाटत होते. मात्र मी हिंदू असल्याचे समजल्यानंतर काही सहकाऱ्यांना आक्षेप असल्याने ब्युरो चीफने मला कार्यालयात पाणी पिण्यासाठी स्वतंत्र पेला आणण्यास सांगितले आहे. आता रमजान सुरू झाल्यानंतर ओआद यांना इफ्तारच्या वेळी सर्वांसोबत डायनिंग टेबलवर बसण्यास परवानगी नाही. कार्यालयात काही खायचे असेल तर तुम्ही स्वतंत्र पेला आणि ताट आणा, असे वरिष्ठ सहकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एपीपीचे व्यवस्थापकीय संचालक मसूद मलिक यांनी दिली. कामगारांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ लेबर फायनान्स अँड रिसर्च (पायलेर) या संस्थेने यासंदर्भात केंद्रीय माहितीमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ‘सरकारी वृत्तसंस्थेचा एक ब्युरो चीफ एका बातमीदाराला तो हिंदू आहे म्हणून पाणी पिण्यासाठी स्वतंत्र पेला आणण्यास सांगतो हे धक्कादायक आहे,’ असे पायलेरचे कार्यकारी संचालक करमात अली यांनी म्हटले आहे.

एपीपीचे कराची ब्युरो चीफ परवेझ अस्लम यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला. ते म्हणाले की, ‘साहिब खान यांना फ्लू झाला असल्याने आम्ही त्यांना स्वतंत्र पेला आणण्याची सूचना केली आहे. हैदराबादहून येथे बदली झाल्यानंतर मी त्यांना मदत केली होती. भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचा त्यांचा आरोप खोटा आहे. तुम्ही कार्यालयात येऊन पाहा. ते इफ्तारच्या वेळी आमच्यासोबतच जेवण करतात.
बातम्या आणखी आहेत...