आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी अहवाल फेटाळण्याचा शरीफ यांच्या पक्षाचा इशारा, असा सुरू झाला सध्याचा पेचप्रसंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पनामागेट भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संयुक्त तपास पथकाचे (जेआयटी) निष्कर्ष फेटाळण्यात येतील, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) या सत्ताधारी पक्षाने दिला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात पुन्हा क्षोभ उसळण्याची शक्यता आहे. शरीफ कुटुंबीयांच्या लंडनमधील मालमत्तांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मे महिन्यात जेआयटी स्थापन केली होती. ती सोमवारी आपला अहवाल सादर करणार आहे.  
 
अहवालाच्या निष्कर्षात कतारचे युवराज तथा माजी पंतप्रधान हमद बिन जस्सीम अल-थानी यांच्या जबाबाचा समावेश नसल्याचा जेआयटीचे निष्कर्ष आमचा पक्ष स्वीकारणार नाही, असे पीएमएल-एनच्या वरिष्ठ नेतृत्वाने शनिवारीच स्पष्ट केले होते. नवाझ शरीफ यांचे कट्टर समर्थक असलेल्या चार केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जेआयटीच्या कार्यपद्धतीबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. या चार मंत्र्यांनी तपासाच्या पद्धतीबद्दलही आक्षेप नोंदवले होते. संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ, रेल्वेमंत्री ख्वाजा साद रफिक, पेट्रोलियममंत्री शाहिद खगन अब्बासी आणि नियोजन, विकासमंत्री अहसान इक्बाल यांनी पत्रपरिषदेत संयुक्त निवेदन जारी केले होते. त्यात म्हटले होते की, कतारच्या माजी पंतप्रधानांचा जबाब जेआयटीच्या अहवालात नसला तर आम्ही तो स्वीकारणार नाही.  जेआयटीचा अहवाल फेटाळण्यात येईल, असे संकेत पीएमएल-एनने प्रथमच दिले आहेत, पण तसे झाल्यास देशात मोठा क्षोभ उसळण्याची शक्यता आहे. तपासाला वेगळे वळण दिल्यास आपण आंदोलन करू, असा इशारा नवाझ शरीफ यांचे कट्टर प्रतिस्पर्धी इम्रान खान यांनी यापूर्वीच दिला आहे.  
 
नवाझ यांच्या वडिलांनी गुंतवली होती रक्कम : अल-थानी  
अल-थानी यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाला दोन पत्रे लिहिली होती. त्यात म्हटले होते की, नवाझ शरीफ यांचे वडील दिवंगत मोहंमद शरीफ यांनी कतारच्या राजघराण्याच्या रिअल इस्टेट व्यवसायात १२ दशलक्ष डिरहॅमची गुंतवणूक केली होती. मोहंमद शरीफ यांंनी गुंतवलेली रक्कम शरीफ यांच्या कुटुंबीयांना नफ्यासह परत करण्यात आली होती. हीच रक्कम लंडनमध्ये मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरण्यात आली, असा दावा शरीफ यांच्या कुटुंबीयांनी सातत्याने केला आहे. मात्र, नवाझ शरीफ हे १९९० च्या दशकात दोन वेळा पंतप्रधान होते. त्या काळात भ्रष्टाचाराद्वारे मिळवलेल्या रकमेतून शरीफ कुटुंबीयांनी लंडनमधील मालमत्ता खरेदी केल्या, असा विरोधकांचा आरोप आहे. जेआयटीचे दोन सदस्य अल-थानी यांचा जबाब नोंदवण्यासाठी कतारला गेले होते, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी आधी दिले होते. पण हे दोघे शासकीय कामासाठी यूएईला गेले होते, असे नंतर स्पष्ट झाले होते.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, असा सुरू झाला सध्याचा पेचप्रसंग...  
बातम्या आणखी आहेत...