आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा देणार नाहीच; पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भूमिकेवर ठाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पनामा पेपर्स भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) आपल्या अहवालात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस केल्यानंतर शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. शरीफ यांनी मात्र गुरुवारी राजीनामा देण्यास ठाम शब्दांत नकार दिला.  
 
‘डॉन ऑनलाइन’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शरीफ यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली होती. त्या वेळी शरीफ म्हणाले की, “जेआयटीचा अहवाल म्हणजे आरोप आणि अटकळींचा समुच्चय आहे.” अहवाल जारी झाल्यानंतर विरोधी पक्ष राजीनाम्याची मागणी करत असल्याकडे निर्देश करून शरीफ म्हणाले की, पाकिस्तानच्या जनतेने मला निवडले आहे आणि फक्त तेच मला पंतप्रधान पदावरून हटवू शकतात. राजकारणात प्रवेश केल्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी काही कमावले तर नाहीच, उलट खूप काही गमावले आहे, असा दावाही त्यांनी केला. जेआयटीच्या अहवालातील भाषा वाईट हेतूने वापरली आहे, असा आरोप करून शरीफ म्हणाले की, जे लोक चुकीच्या अनावश्यक दाव्यांच्या आधारे माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत त्यांनी आधी स्वत:कडे पाहावे. कट रचणारे माझ्या राजीनाम्याची मागणी करत असले तरी मी राजीनामा देणार नाही. पनामा पेपर्स प्रकरणातून निर्दोष बाहेर पडण्यासाठी शरीफ यांनी कायदेशीर लढा द्यावा, अशी सूचना मंत्रिमंडळातील सदस्यांनी केली, असे वृत्तही ‘डॉन’ने दिले आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानी झालेल्या ‘अनौपचारिक बैठकीत’ मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  
 
जोपर्यंत निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत नवाझ शरीफ यांनी राजीनामा द्यावा आणि सत्तेपासून दूर राहावे, अशी मागणी पाकिस्तानमधील सर्व विरोधक करत आहेत.  
 
शरीफ कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करा : जेआयटीची शिफारस  
नवाझ शरीफ यांच्या कुटुंबीयांनी १९९० च्या दशकात लंडनमध्ये काही मालमत्ता खरेदी केल्या होत्या, असे पनामा पेपर्समध्ये म्हटले होते. त्यासाठीच्या रकमांचा स्रोत देण्यात शरीफ यांच्या कुटुंबीयांना अपयश आल्याने सर्वोच्च न्यायालयाने सहा सदस्यांची जेआयटी स्थापन केली होती. या समितीने १० जुलैला सर्वोच्च न्यायालयाला १० खंडांतील अहवाल सादर केला होता. नवाझ शरीफ, त्यांची मुले हसन आणि हुसैन, मुलगी मरयम नवाज यांच्याविरुद्ध राष्ट्रीय उत्तरदायित्व विभाग (एनएबी) अधिसूचना १९९९ च्या आधारे भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस जेआयटीच्या अहवालात करण्यात आली आहे.  
बातम्या आणखी आहेत...