आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘लष्कर’चा मी सर्वात मोठा पाठीराखा : परवेझ मुशर्रफ; काश्मीरमध्ये कारवाई व्हावी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- लष्कर-ए-तोयबाचा मी नेहमीच पाठीराखा राहिलो आहे. संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद मला आवडतो. सईदचा काश्मीरमध्ये हस्तक्षेप असतो व या गोष्टीचे मी समर्थन करतो, असे  विखारी वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी बुधवारी केले.   


पाकिस्तानच्या एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ म्हणाले, लष्कर व जमात-उद-दावा या दोन्ही संघटना मला आवडतात. मी हाफिजला भेटलेलो आहे. जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी जमात व लष्कर जिहादचा वापर करत आहे का? त्यावर मुशर्रफ म्हणाले, होय.  दोन्ही संघटना काश्मीरच्या प्रकरणात सहभागी आहेत. मी त्यांचा समर्थक आहे. मी   नेहमीच काश्मीरवर कारवाई करावी आणि भारतीय सैन्यावर दबाव वाढवण्याच्या बाजूने राहिलो आहे. भारताने अमेरिकेसोबत भागीदारी करून लष्कर संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे, असा आरोप मुशर्रफ यांनी केला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात लष्कर किंवा हाफिजचा हात असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. पाकिस्तान हाफिजला दहशतवादी मानत नाही. देशात लोकशाहीला काहीही धोका नाही.

 

अमेरिकेचे वक्तव्य;  हा पाकिस्तानचा अपमान  
मुशर्रफ म्हणाले, गेल्या आठवड्यात हाफिजच्या सुटकेनंतर अमेरिकेने वक्तव्य जारी केले. त्यामुळे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा अपमान झाला आहे. कृपया आम्हाला आदेश देऊ नका. कोणावर विश्वास ठेवायचा किंवा कोणाला दंड द्यायचा हे आम्हाला ठरवू द्या. हाफिजवर अमेरिकेने १० लाख डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. त्याला दहा महिने नजरबंद ठेवल्यानंतर त्याची सुटका झाली होती. त्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर त्यास अटक करण्यास सांगितले होते.  

 

फरार आरोपी 

माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणात दहशतवादी प्रतिबंधक न्यायालयाने मुशर्रफ यांना फरार घोषित केले आहे. सध्या मुशर्रफ दुबईच्या आश्रयाला आहेत. मुशर्रफ सत्तेवर होते तेव्हापासूनच लष्करवर पाकिस्तानात निर्बंध लावण्यात आले होते. ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यांनी तालिबानचे समर्थन केले होते. आेसामा बिन लादेन त्यांचा हीरो असल्याचे म्हटले होते.  

बातम्या आणखी आहेत...