Home »International »Pakistan» Pak Army Dismisses Speculations Of Playing Any Role In Destabilising Govt

21 पटीने वाढली शरीफांच्या कन्येची मालमत्ता; राजकीय हालचालींना वेग, लष्करशाहीची भिती

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 15:35 PM IST

  • कुठल्याही प्रकारचे आर्थिक कमाईचे स्रोत नसताना विद्यार्थी आयुष्यातच मरियमच्या संपत्तीमध्ये 21 पटीने वाढ झाली.
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि कुटुंबियांच्या कथित भ्रष्टाचार आणि बेनामी मालमत्ता प्रकरणाची सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात पनामा पेपर्स प्रकरणातील जेआयटीच्या चौकशी अहवालावर प्रामुख्याने चर्चा झाली. या अहवालानुसार, 1992-93 मध्ये कुटुंबीय आणि शरीफांची कन्या मरियम हिची मालमत्ता अचानक 21 पटीने वाढली. शरीफ कुटुंबियांच्या वकीलांनी त्या विरोधात युक्तीवाद मांडले. यानंतर सुप्रीम कोर्टाची सुनावणी एका दिवसासाठी तहकूब करण्यात आली. मात्र, या गोंधळात पाकिस्तानचे लष्करच सत्ता काबिज करण्यासाठी शरीफ कुटुंबियांच्या विरोधात षडयंत्र करत असल्याची चर्चा आहे. वाढते आरोप पाहता लष्कराला माध्यमांसमोर येऊन यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

लष्कराचे काय म्हणणे आहे?
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि कुटुंबियांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि बेनामी मालमत्तेचे आरोप सिद्ध झाल्यास शरीफांचे पद जाऊ शकते. अशात पाकिस्तानचे लष्करप्रमुख अर्ध्या रात्रीत सत्ता काबिज करून लष्करशाही लागू करू शकतात अशी भिती सुद्धा वर्तवली जात आहे.
- त्यातच पाकिस्तानच्या लष्कराने माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितल्याप्रमाणे, "पंतप्रधान शरीफ किंवा सरकार विरोधात लष्कर काही षडयंत्र रचत आहे का? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा देणे मला महत्वाचे वाटत नाही."
- पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. लष्कर सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत नाही असेही ते पुढे म्हणाले.

21 पटीने वाढली मरियमची संपत्ती
- जेआयटीने आपल्या चौकशीचा अहवाल गेल्या आठवड्यातच सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. 6 सदस्यीय समितीच्या 256 पानांच्या अहवालानुसार, पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीमध्ये 1992-93 पासून अचानक वाढ झाली.
- शरीफ कुटुंबियांची मालमत्ता 75.3 लाख पाकिस्तानी रुपये (जवळपास 38 लाख भारतीय रुपये) एवढी होती. त्यामध्ये अचानक वाढ होऊन ती 3.21 कोटी रुपयांपर्यंत पोहचली. अर्थात अवघ्या वर्षभरातच त्यामध्ये 4.3 पटीने वाढ झाली.
- त्यातही शरीफ यांची राजकीय वारसदार मानली जाणारी कन्या मरियम सफदर हिच्या संपत्तीचा विचार केल्यास 1992 मध्ये तिच्याकडे 14 लाख पाकिस्तानी रुपये होते. कुठल्याही प्रकारचे आर्थिक कमाईचे स्रोत नसताना विद्यार्थी आयुष्यातच तिच्या संपत्तीमध्ये 21 पटीने वाढ दिसून आली.
- सद्यस्थितीला शरीफ कुटुंबियांच्या नामी आणि बेनामी मालमत्तेमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामध्ये लंडनमधील फ्लॅट्स आणि इतर देशांमध्ये बेनामी कंपन्यांचा देखील समावेश आहे.

Next Article

Recommended