इस्लामाबाद- पाकिस्तानात भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी सुरु आहे. आता पाकिस्तानने दावा केला आहे की, आंतरराष्ट्रीय कोर्टाने भारताची या खटल्याची सुनावणी डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती फेटाळून लावली आहे. 19 मे रोजी ICJ ने पाकिस्तानला अंतिम फैसला होईपर्यंत जाधव यांना फाशी देऊ नये असे सांगितले होते.
पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने सुनावली होती फाशीची शिक्षा
- पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिलमध्ये कुलभूषण जाधव यांना गुप्तहेरीबद्दल आणि देशविरोधी कारवायांबद्दल फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताचे म्हणणे आहे की, जाधव यांचे इराणमधुन अपहरण करण्यात आले. भारतीय नौदलातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर ते इराणमध्ये व्यवसाय करत होते.
- पाकिस्तानचे म्हणणे आहे की जाधव यांना बलूचिस्तानमधुन 3 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली. पाकिस्तानने जाधव यांच्यावर बलूचिस्तानमध्ये अशांतता माजविल्याचा आणि गुप्तहेरी केल्याचा आरोप आहे.
- भारताने जाधव यांना फाशी दिल्याच्या विरोधात नेदरलॅंडच्या हेग येथील आंतरराष्ट्रीय कोर्टात (ICJ) 8 मे रोजी अपील केले होते.
पाकिस्तानने केला काय दावा?
- पाकिस्तानने म्हटले आहे की, ICJ ने भारताला 13 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. कोर्टाने पाकिस्तानला काउंटर प्ली फाइल करण्यासाठी डिसेंबरची डेडलाइन दिली आहे.
- डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने अॅटर्नी जनरल अश्तर औसफ अली यांच्या हवाल्याने ICJ एका पत्राद्वारे पाकिस्तानला आपल्या फैसल्याबाबत सांगितले आहे.