आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान: बाल्टिस्तानमध्‍ये 8 जूनला निवडणूक, भारताची तीव्र नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकव्याप्त जम्मू-काश्मीरचा एक भाग असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये ८ जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यावर भारताकडून मांडण्यात आलेल्या भूमिकेकडे पाकिस्तानने कानाडोळा केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. हा ‘अंतर्गत कारभारातील हस्तक्षेप ’ अाहे, अशा शब्दांत भारताने आपली नाराजी व्यक्त केली होती, परंतु पाकिस्तानने कुरापती सुरू ठेवताना नाराजी फेटाळून लावली आहे.

आमच्या प्रदेशात बळजबरीने घुसखोरी करून अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करणे अयोग्य आहे. निवडणूक घेणे तर बेकायदा आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी मंगळवारी म्हटले होते. त्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र बुधवारी देशाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हेच सांगितले. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या नियमानुसार एखाद्या प्रलंबित समस्येवर तोडगा काढण्याचा नि:पक्ष प्रयत्न करण्यात गैर काहीच नाही. त्यावर अनेक ठरावही झाले आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरील काश्मीर हा तंट्याचा मुद्दा म्हणून आेळखला जातो, असे पाकच्या मंत्रालयाने निर्लज्जपणे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर भारताच्या घुसखोरीच्या आरोपाला उत्तर देताना शेजारी राष्ट्राने भारताच्या नावानेच शिमगा सुरू केला आहे. त्या वेळी पाकच्या केंद्र सरकारने येथे एक स्वायत्त प्रांत व्यवस्था स्थापन केली होती.

स्वयंघोषित सरकार
पाकिस्तानच्या पाठिंब्यावर तेथील स्वयंघोषित सरकारने निवडणुकीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार ८ जून रोजी निवडणूक जाहीर झाली आहे. ‘गिलगिट बाल्टिस्तान एम्पॉवरमेंट अँड सेल्फ गव्हर्नमेंट ऑर्डर’द्वारे निवडणुकीची कुरापत काढण्यात आली आहे.

दोन्ही प्रदेश भारताचेच
जम्मू-काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान हे दोन्ही प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत, परंतु पाकिस्तान या भागात सातत्याने हस्तक्षेप करून फुटीरतावाद्यांना फूस लावण्याचे काम करत आला आहे. त्याला भारताकडून वारंवार चव्हाट्यावर आणण्यात आले आहे.

उलट्या बोंबा
भारताने जम्मू-काश्मीरमधील काही प्रदेशांवर घुसखोरी करण्यासाठी आणि सत्ता गाजवण्यासाठी ७ लाखांहून अधिक सैन्य तैनात करून मुजाेरी केली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. सैन्य तैनात करून काश्मिरातील जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न भारताने चालवल्याच्या बोंबाही पाकिस्तानने मारल्या आहेत.

संयुक्त राष्ट्राची भूमिका
संयुक्त राष्ट्राची भूमिका यात महत्त्वाची आहे. संयुक्त राष्ट्राने हे प्रांत वादग्रस्त असल्याचे एका ठरावाद्वारे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानला अनेक कुरापती करूनही त्यावर पूर्ण ताबा मिळवता येत नाही. अर्थात त्यामुळेच आपले हे प्रांत अाहेत, असे दाखवणे पाकिस्तानसाठी अत्यंत कठीण असल्याचे जाणकारांना वाटते.