आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानला अमेरिकेच्या ९/ ११ कायद्याची धास्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - ९/११ प्रकरणी हल्ल्यातील पीडितांना पाकिस्तानचा सहकारी देश सौदी अरेबियाच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी देणारा कायदा नुकताच पारित करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तान चिंतेत पडला आहे.

२८ सप्टेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या व्हेटोला केराची टोपली दाखवत काँग्रेसने ‘प्रायोजित दहशतवादी कृत्यविरोधी न्याय’ कायद्याला मंजुरी दिली होती. त्यालाच अनौपचारिकरीत्या ९/११ चा कायदा म्हणून आेळखण्यात येत आहे. वास्तविक सौदी अरेबियाला डोळ्यासमोर ठेवून या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. त्याचा फटका सौदीला बसणार आहे. कारण ११ सप्टेंबरच्या हल्ल्यातील हल्लेखोरांपैकी बहुतांश सौदीचे नागरिक होते. त्यामुळे सौदीच्या विरोधात पीडितांचे नातेवाईक खटला चालवू शकणार आहेत. सौदी व पाकिस्तान यांच्यात निकटची भागीदारी आहे. ऐतिहासिक व भौगोलिकदृष्ट्याही दोन्ही देश परस्परांचे मित्र आहेत. सौदीत मोठ्या संख्येने पाकिस्तानी रोजगारासाठी जातात. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यामागे हात असल्याचा सौदीने इन्कार केला आहे. २००१ च्या घटनेत सुमारे ३ हजार नागरिकांना प्राण गमवावे लागले होते.

अमेरिका व भारत यांच्यातील जवळीक वाढत असतानाच पाकिस्तान राजकीय पातळीवर अस्वस्थ दिसू लागला आहे. त्यातच संसदेच्या सभागृहाने हा व्हेटो फेटाळून नवा प्रस्ताव स्वीकारल्याने पाकिस्तानला आपली गोची झाल्याचेही वाटते.

पाकिस्तानला मदत
२००० मध्ये सौदी अरेबियाने सत्ता सोडावी लागलेल्या नवाझ शरीफ यांना राजाश्रय दिला होता. २०१३ मध्ये ते विजयी झाल्यानंतर त्यांच्या सरकारला सौदीच्या सरकारने सुमारे १.५ अब्ज डॉलर्सचे कर्जही दिले होते. सौदीकडून पाकिस्तानला नेहमीच मदत मिळाली आहे. त्यामुळे सौदीला धोका असल्याचे पाहताच पाकिस्तानने अमेरिकेच्या विरोधात सूर आळवला.
बातम्या आणखी आहेत...