आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोणत्याही संशयिताला शिक्षा देण्यात पाकिस्तानला नाही रस; निरीक्षकांचे मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला करून १६६ जणांना ठार मारल्याच्या घटनेला ९ वर्षे पूर्ण झाली असली तरी पाकिस्तानने या प्रकरणातील कुठल्याही संशयिताला शिक्षा ठोठावलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानसाठी या प्रकरणाला काहीच प्राधान्य नसल्याचे दिसते, हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटकेनंतर हे विशेषत्वाने दिसते, असे मत निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.  


नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ वकिलाने सांगितले की, इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयात मुंबई हल्ल्याचा खटला २००९ पासून सुरू आहे. या न्यायालयात आठ वर्षांपेक्षा जास्त काळ कुठलाही खटला प्रलंबित नाही. दहशतवादविरोधी न्यायालय जलदगती सुनावणीसाठीच आहे. भारतासारख्या कट्टर शत्रूशी संबंधित खटला असल्यामुळेच पाकिस्तानला या प्रकरणात कुठलीही घाई नसावी, असे दिसत आहे.  


सर्वोच्च न्यायालयातील वकील मोबीन अहमद काझी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, दहशतवादविरोधी न्यायालयात खटला सुरू असल्याने खरे तर लवकर निकाल लागायला हवा होता. आता ८ वर्षे झाली आहेत. अशा प्रकरणांत पुरावे नष्ट केले जातात. पाकिस्तान एवढा दीर्घ काळ का लावत आहे, हेच समजत नाही. भारत जर भक्कम पुरावे देत नसेल तर पाकिस्तानने खटला तसाच चालवून संशयितांची मुक्तता करावी. 

 

हाफिजच्या सुटकेने इतरांच्याही आशा पल्लवित  

प्रतिबंधित जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफिज सईदच्या सुटकेमुळे या प्रकरणात गेल्या आठ वर्षांपासून खटला सुरू असलेल्या इतर सहा संशयितांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. सईदची गेल्या शुक्रवारी नजरकैदेतून सुटका झाली होती. तो या वर्षी जानेवारीपासून नजरकैदेत होता. जमात-उद-दावा ही लष्कर-ए-तोयबाची आघाडीची संघटना आहे. जमात-उद-दावाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, आपला नेता हाफिज सईदच्या विरोधात काहीही सिद्ध झाले नाही.

 

त्यामुळे त्याच्याप्रमाणेच एक दिवस आपणही बाहेर येऊ, असा विश्वास या सहा संशयितांना वाटत आहे. या सहा संशयितांत अब्दुल वाजिद, मझहर इक्बाल, हमाद अमीन सादिक, शाहिद जमील रियाझ, जमील अहमद आणि युनूस अंजुम यांचा समावेश आहे. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मुंबई हल्ल्याचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी असे आरोप आहेत. या सर्वांची जलदगती न्यायालयात सुनावणी झाली असती तर त्यांचीही सुटका झाली असती. हे सहा जण सध्या रावळपिंडीमधील अदियाला तुरुंगात आहेत.  

बातम्या आणखी आहेत...