आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताची कापूसकोंडी करण्याचा पाकचा प्रयत्न, भाज्यांची आयातही रोखली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - नियंत्रण रेषेवरील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानने भारताकडून होणारी कापूस आणि भाज्यांसह कृषी उत्पादनांची आयात रोखली आहे, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

‘डॉन’च्या वृत्तात म्हटले आहे की, वाघा सीमा आणि कराची बंदरातून भारतामधून येणारी कृषी उत्पादनांची आयात रोखण्यात आली आहे. आगामी आयातीसाठी देण्यात येणारे परवाने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नियंत्रण रेषेवरील वाढत्या तणावामुळे संबंधित विभागाने कुठलीही आगाऊ सूचना किंवा लेखी आदेश न देताच कृषी उत्पादनांची आयात थांबवली आहे, असा दावा कापूस आयातदार आणि जकात एजंट्सनी केला आहे.

वनस्पती संरक्षण विभागाचे (डीपीपी) प्रमुख इम्रान शमी यांनी मात्र आयात रोखल्याचा इन्कार केला. ते म्हणाले की, आमच्याकडे टोमॅटो आणि इतर भाज्यांचा भरपूर साठा आहे. देशांतर्गत बाजारात कमतरता भासली तरच आम्ही भारताकडून आयात करतो. शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठीच आम्ही टोमॅटो आणि इतर ताज्या भाज्यांची आयात थांबवली आहे. कापसाची आयात आम्ही थांबवली नाही. भारतीय निर्यातक आमच्या जैव-संरक्षण अटींची पूर्तता करत नाही, असे वृत्त आल्यामुळे ती प्रलंबित ठेवण्यात आली आहे. आम्ही या वृत्ताची छाननी करत आहोत. आमची भीती खोटी ठरली तर आम्ही कापूस आयातीवरील निर्बंध मागे घेऊ.

११ ट्रक रोखले
एका सूतगिरणीच्या मालकाने ‘डॉन’ला सांगितले की, वाघा आणि कराची येथून येणारे आमचे कापसाचे ११ ट्रक मंत्रालयाने रोखले आहेत. त्याचे कारण त्यांनाच माहीत आहे. भारताकडून कापसाची आयात रोखल्यास त्याचा वस्त्रोद्योग निर्यातीवर विपरीत परिणाम होईल. या वर्षी पाकिस्तानमध्ये कापसाच्या ११.२५ दशलक्ष गाठी तयार होतील, अशी अपेक्षा आहे. वस्त्रोद्योग निर्यात उद्योगाला १४ दशलक्ष गाठींची गरज आहे. उद्दिष्ट गाठले तरी आम्हाला ३ दशलक्ष गाठी कमी पडतील.
बातम्या आणखी आहेत...