आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतालाच चर्चा करण्याचे वावडे, नवाझ शरीफ यांचा पुन्हा कांगावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारतच चर्चेपासून पळ काढत असून त्याऐवजी युद्धसदृश स्थिती निर्माण करत आहे, असा दावा पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात केला. शेत जमिनींवर रणगाडे चालवून गरिबी हटवली जाऊ शकत नाही, असा टोला त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाविषयक स्थितीवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्यात आले होते. अधिवेशनाला संबोधित करताना शरीफ म्हणाले की, भारताने चर्चा करण्यासाठी यावे यादृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, पण भारताने चर्चाच होऊ दिली नाही. आमचे प्रयत्न वारंवार हाणून पाडण्यात आले. उरीतील हल्ल्याची कुठलीही चौकशी न करता भारताने काही तासांतच त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवले.

भारताने एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असा आरोप करून शरीफ म्हणाले की, भारताच्या हल्ल्यात आमचे दोन सैनिक ठार झाले. पाकिस्तानच्या लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर देऊन आम्हीही कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्यास सक्षम आहोत हे दाखवून दिले. पाकिस्तानचा या हल्ल्यात हात असल्याचे सिद्ध होण्यापूर्वीच आम्हाला जबाबदार धरण्यात आले. यामागे भारताची काही चाल आहे. भारताने एलओसीवीरल शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून पाकिस्तानवर आक्रमण केले, असा आरोपही त्यांनी केला.

काश्मिरी नागरिकांना पाठिंबा
शरीफ यांनी काश्मिरी नागरिकांना पाठिंबा व्यक्त केला आणि काश्मीरचा प्रश्न तेथील नागरिकांची इच्छा आणि संयुक्त राष्ट्रांचा ठराव याद्वारेच सोडवावा, अशी टिप्पणी केली. त्यांनी भाषणात पुन्हा एकदा बुरहान वानीचा उल्लेख केला. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाची अंमलबजाणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. पाकिस्तानविरुद्ध आरोप करून काश्मीरमध्ये होणाऱ्या अत्याचारांपासून जगाचे लक्ष वळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला. कुठलाही हल्ला उधळून लावण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाव्यतिरिक्त सर्व विरोधी पक्ष या संयुक्त अधिवेशनाला उपस्थित होते. शरीफ हे देशाचे नेतृत्व करण्यास लायक नाहीत, या अधिवेशनामुळे त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल, असे म्हणत इम्रान यांच्या पक्षाने अधिवेशनावर बहिष्कार टाकला.

रणगाडे चालवून गरिबी हटवता येत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देताना शरीफ म्हणाले की, ‘रणगाडे चालवून गरिबी हटवता येत नाही. आम्ही गरिबीशी लढा द्यावा, असे त्यांना (भारतीय नेत्यांना) वाटत असेल तर शेतजमिनीवर रणगाडे चालवून गरिबी हटवता येत नाही याची जाणीव त्यांना व्हायला हवी. ’पाकिस्तानने गरिबी, बेरोजगारी, निरक्षरतेच्या विरोधात लढा द्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले होते.
बातम्या आणखी आहेत...