आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीच्या कुलभूषण जाधवांना हेर सांगत पाकने सुनावली मृत्युदंडाची शिक्षा, ही हत्या ठरेल- भारत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/ नवी दिल्ली- पाकिस्तानने भारतीय नौदलातील माजी अधिकारी आणि मूळ महाराष्ट्रातील सांगलीचे रहिवासी कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. पाकच्या लष्करी न्यायालयाने  त्यांना रॉ या भारतीय गुप्तहेर संस्थेसाठी हेरगिरी आणि विध्वंसक कारवायांसाठी दोषी ठरवले आहे. भारताने या निकालावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कुलभूषण जाधवला फाशी देणे ही सुनियोजित हत्याच ठरेल, असे भारताने म्हटले आहे.

परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून विरोधाचे पत्र सोपवले. पाकने जाधव यांना शिक्षेची औपचारिक माहिती दिली नाही. पाकिस्तानी लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारेच या शिक्षेची माहिती झाली. पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतर अत्यंत तणावाच्या पातळीवर असलेले भारत-पाकिस्तानचे संबंध या घटनाक्रमामुळे आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. जाधव यांना शिक्षा ठोठावल्यानंतर भारताने सुमारे १२ पाक कैद्यांची सुटका थांबवली आहे.

मागील वर्षी ३ मार्च रोजी अटकेनंतर जाधव हे भारतीय नौदलात कार्यरत आहेत व ते २०२२ मध्ये निवृत्त होतील, असा दावा पाकिस्तानने केला होता. तर जाधव यांनी २००२ मध्येच निवृत्ती घेतली आहे. सध्या ते इराणच्या चाबहारमध्ये व्यापार करत आहेत. भारत सरकारशी त्यांचा संबंध नसल्याचा भारताचा दावा आहे.

शिक्षेच्या निर्णयावर ९० दिवसांत अंमलबजावणी अटळ, अपीलाची संधी कमी : पाकिस्तानी लष्कराच्या कायद्यानुसार दिलेल्या या शिक्षेवर ९० दिवसांच्या आत अंमलबजावणी होणे निश्चित आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी त्याला मंजुरीही दिलेली आहे. त्यामुळे या शिक्षेविरुद्ध अपील करण्याची कोणतीही संधी शिल्लक राहत नाही.

६ मिनिटांच्या कबुलीजबाबात १०५ कट, भारताने फेटाळले
पाकने गेल्या वर्षी जाधवांच्या कथित कबुलीजबाबाचा व्हिडिओ जारी केला होता. त्यात काटछाट होती. ६ मिनिटांच्या व्हिडिओत १०५ कट आहेत. त्यात विविध अँगलने चित्रित झालेली वक्तव्ये जोडली आहेत. जाधव टेलिप्रॉम्पटरवर वाचत आहेत,असे वाटते. पाक प्रकरणांचे तज्ज्ञ कमर आगा म्हणाले, छळ करून किंवा ड्रग्ज देऊन जाधव यांच्याकडून वदवून घेतल्याची शक्यता वाटते. भारताने व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानचा दावा: बलुचिस्तानात अटक, पाकविरुद्ध युद्ध पुकारल्याची दिली कबुली
कुलभूषण सुधीर जाधव ऊर्फ हुसेन मुबारक पटेल यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानातील माशकेलमध्ये पकडले. लष्करी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध पाक लष्करी कायदा व कार्यालयीन गोपनीयतेच्या कायद्यांतर्गत खटला चालला. दोषी आढळल्याने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. पाकला अस्थिर करणे व त्याविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी रॉने हेरगिरी व विध्वंसक कारवायांची जबाबदारी सोपवली. हा बलुचिस्तान व कराचीमध्ये शांततेचे प्रयत्न उधळण्याचा कट होता, अशी कबुली जाधवांनी दिली. त्यांना वकीलही दिला होता.
- पाकिस्तानी लष्कराचे प्रसिद्धिपत्रक

भारताचा युक्तिवाद: इराणमधून अपहरण, १२ महिन्यांत १३ वेळा सांगूनही भेट नाकारली
जाधव यांचे मागच्या वर्षी इराणमधून अपहरण झाले होते. ते पाकमध्ये असल्याची कोणतीही माहिती दिली गेली नाही. त्यांच्याशी राजनैतिक संपर्कासाठी १२ महिन्यांत १३ वेळा औपचारिक विनंत्या पाठवल्या. पण पाकने फेटाळल्या. जाधवांविरुद्ध विश्वासू पुरावे नसताना कारवाई दुर्दैवी आहे. भारतीय उच्चायुक्तांना जाधवांविरुद्धच्या कायदेशीर कारवाईची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे जाधवांना बचावासाठी वकील दिल्याचे सांगणे पूर्णत: बेइमानी आहे. जर कायद्याच्या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली करून शिक्षा दिली गेली तर भारत सरकार आणि जनता ही सुनियोजित हत्याच समजेल. 
- अब्दुल बासित यांना दिलेले निषेध पत्र

आंतरराष्ट्रीय मानकांकडे पाकचे दुर्लक्ष : अॅम्नेस्टी
लंडन-
जाधवांची शिक्षा आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन आहे. लष्कर प्रणाली  शिस्तीच्या मुद्द्यांच्या निराकरणासाठी असते. गुन्ह्यांसाठी नाही, असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे.

पनवेलमध्ये आईचा फ्लॅट, १० वर्षांपूर्वी पटेलांकडे
पनवेल-
हाय पॉइंट इमारतीच्या  सी विंगमधील फ्लॅट क्रमांक ३ कुलभूषणची आई अवंती यांचा आहे. १० वर्षांपूर्वी इथे हुसेन पटेल नावाची व्यक्ती राहत होती. सध्या घर बंद आहे. 

जाधव यांच्या बचावासाठी बालमित्र मोहीम उघडणार
जाधवांचे बालपणीचे मित्र तुळशीदास पवार म्हणाले, त्यांच्या बचावासाठी मोहीम उघडू. ते रॉचे एजंट असतील असे वाटले नाही. ते नौदलातून कधी निवृत्त झाले याची काहीच माहिती नाही.
 
पुढे पाहा, जाधव यांच्या मुंबईतील घरासमोर पोलिस बंदोबस्त..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...