आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिबंधित दहशतवादी गटांवर पाकिस्तानचे नियंत्रण नाही! माध्यमांचा आहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - हाफिज सईद याच्या नेतृत्वाखालील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहंमद यासारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटना सतत नव्या नावाने काम करत असून पाकिस्तान सरकारच्या अधिकारालाच आव्हान देत आहेत. मात्र, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरत आहे, असा ‘घरचा आहेर’ पाकिस्तानी माध्यमांनी दिला आहे.

‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तात म्हटले आहे की, १९९७ च्या दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार, कोणत्या गटावर बंदी घालायची हे निश्चित करणे गृह मंत्रालयाचे काम आहे, पण पुन्हा नव्या नावाने काम करणाऱ्या या गटांना रोखणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हेही या मंत्रालयाचेच काम आहे. मात्र, या गटांच्या व संघटनांच्या कामाला आळा घालण्यात मंत्रालय अपयशी ठरले आहे. मंत्रालयाने प्रतिबंधित संघटनांची यादी डिसेंबर २०१५ मध्ये सिनेटला सादर केली होती. या यादीत ६१ नावे होती. तेव्हापासूून त्या यादीचे नूतनीकरण करण्यात आले नाही तसेच ती सार्वजनिकही करण्यात आली नाही. सेंटर फॉर रिसर्च सिक्युरिटी स्टडीजचे (सीआरएसएस) कार्यकारी संचालक इम्तियाज गुल यांचा हवाला देऊन या वृत्तात म्हटल आहे की, कायद्याची योग्य अंमलबजावणी न करणे हेच या मागचे कारण आहे. गुल यांनी म्हटले आहे की, देशात संबंधित कायदे अस्तित्वात आहेत.

तीन संघटना नाव बदलून आहेत कार्यरत
‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने तीन दहशतवादी संघटनांवर बंदी असतानाही त्या नव्या नावाने कशा कार्यरत आहेत याची माहिती वृत्तात दिली आहे.
१.मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेवर २००२ मध्येच बंदी घातली होती. हा गट जमात-उद-दवा हे नवे नाव घेऊन काम करत आहे. या गटाने चॅरिटी नेटवर्कमार्फत कामाचा विस्तार सुरू केला आहे. संयुक्त राष्ट्रांची बंदी असूनही सरकारने या संघटनेला फक्त ‘निरीक्षणाखाली’ ठेवले आहे, तर संघटनेचा म्होरक्या सईद हा जाहीर भाषणे देऊन हेडलाइनमध्ये झळकत आहे, असे या वृत्तात नमूद केले आहे.
२.सिपाह-ए-साहबा पाकिस्तान (एसएसपी) या गटावर २२ जानेवारी २००२ रोजी पहिल्यांदा बंदी घालण्यात आली. हा गट मिल्लत-ए-इस्लामी या नव्या नावाने कार्यरत आहे. या गटावरही नोव्हेंबर २००३ मध्ये बंदी घालण्यात आली, पण ही बंदी न जुमानता हा गट अहल-ए-सुन्नत वल जमात (एएसडब्ल्यूजे) हे नाव घेऊन काम करत आहे. त्या गटावरही १५ फेब्रुवारी २०१२ रोजी बंदी घालण्यात आली, तरीही ती झुगारून देऊन कार्यरत आहेच.
३.भारतातील अनेक हल्ल्यांसाठी जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या जैश-ए-मोहंमद या संघटनेवर पहिल्यांदा २२ जानेवारी २००२ रोजी बंदी घालण्यात आली होती. या संघटनेनेही ‘खुद्दम-ए-इस्लाम’ या नव्या नावाने काम करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने या नव्या गटावर १५ नोव्हेंबर २००३ ला बंदी घातली होती, पण तो गट लपूनछपून काम करतच आहे.
बातम्या आणखी आहेत...