इस्लामाबाद- पाकिस्तानने आता नवा पवित्रा घेत पेशावरमधील एका शाळेत व कराचीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचा हात असल्याचा दावा केला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, पाकिस्तानात वाढत्या दहशतवादी कारवायांवर तेथील सरकार विशेष दस्तऐवज तयार करीत असून यात भारताचा कसा हात आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांत होणाऱ्या चर्चेदरम्यान हे दस्तऐवज सोपवले जाणार आहेत.
बलुचिस्तान, फाटा आणि अफगाणिस्तानात जे दहशतवादी हल्ले होत आहेत त्याचे खापर भारतावर फोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अाहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तान समझौता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटाची अतिशय धिम्या गतीने होत असलेली चौकशी कशी आक्षेपार्ह आहे, हे पाकिस्तान पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज हे दस्तऐवज अजित डोभाल यांच्याकडे सोपवतील.
दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित व्हावी व तणाव कमी व्हावा म्हणून चर्चा पुन्हा प्रारंभ करण्यासंबंधी रशियातील उफामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात एकमत झाले होते. या चर्चेच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही देशांचे सुरक्षा सल्लागार पुढील महिन्यात दिल्लीत भेटत आहेत. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रहेमान लखवी याला देण्यात आलेल्या जामिनाचा मुद्दा भारत या चर्चेत प्राधान्यक्रमाने मांडणार आहे.