आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: ५८ अब्ज डॉलर खर्चून पाक वीज समस्या साेडवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानला गेल्या अनेक वर्षांपासून भारनियमनासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, परंतु कायम संरक्षणाच्या क्षेत्रात अधिक रमलेल्या सरकारला उशिरा का होईना जाग आली असून २०१८ पर्यंत वीज समस्येतून देशाला बाहेर काढण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी २०२२ पर्यंत सुमारे ५८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) सरकारला याच आठवड्यात तीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत जल व ऊर्जा मंत्री ख्वाजा असिफ यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ५८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून ३० हजार ९४८ मेगा वॉट वीजनिर्मिती शक्य होईल. २०२२ पर्यंत हे लक्ष्य गाठता येणार आहे, असा दावा असिफ यांनी केला आहे. वास्तविक देशात सूर्यप्रकाश सर्वाधिक काळ उपलब्ध होतो, परंतु त्याचा आवश्यक तेवढा उपयोग करून घेतला जात नाही. आपण केवळ इलेक्ट्रिक विजेवर अवलंबून आहोत, हे दुर्दैव आहे. विजेच्या तुटवड्यामुळे देशात सर्वत्र भारनियमनाची समस्या दिसून येते, असे असिफ यांनी सांगितले.

काही प्रकल्प पुढील वर्षी सुरू होणार
पाकिस्तानने संरक्षण, लष्करातून डोके वर काढून तिजोरीतील काही पैसा पायाभूत क्षेत्रावर खर्च करण्यास काही प्रमाणात सुरुवात केली आहे, असे दिसते. त्यामुळे २०१७ च्या मध्यावर एलएनजी ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पातून ४ हजार मेगावॉट वीजनिर्मिती होईल. त्याच वर्षी जूनमध्ये आणखी एक प्रकल्प सुरू होईल.

गॅस पाइपलाइनसमोर अनेक संकटे, तिढा सुटेना
इराण-पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाकांक्षी गॅस पाइपलाइन प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यास देशाची इंधनाची समस्या किमान २० वर्षांसाठी सुटणार आहे. मात्र, त्यात आर्थिक देवाणघेवाणीत अडथळे येऊ लागले आहेत. प्रकल्पासाठी इराणची अनुकूलता आहे, परंतु डॉलरमधील व्यवहाराचा मार्ग अद्याप सुकर झालेला नाही. म्हणून पुढील व्यापारही तितका सोपा राहिलेला नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात पेट्रोलियम मंत्री शाहिद खाकन अब्बासी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...