आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला गाढवांची निर्यात करण्याचा पाकचा विचार; 1 अब्ज रुपयांचा प्रकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर- ‘गाढव विकास कार्यक्रमा’अंतर्गत १ अब्ज रुपये खर्च करून चीनला गाढवांची विक्री करण्याची पाकिस्तानची योजना आहे. खैबर-पख्तुनख्वा या वायव्य प्रांतात चीनच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नाचा हा भाग आहे. चीनमध्ये औषध निर्मितीसाठी गाढवांचा उपयोग होत असल्याने त्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे या प्रांतात गाढवांची संख्या वाढवण्यासाठी पावले उचलली जात आहेत.  
 
‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने याबाबतच्या अधिकृत दस्तावेजांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ‘खैबर-पख्तुनख्वा-चीन शाश्वत विकास कार्यक्रम’ १ अब्ज रुपयांचा (९.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे, तर चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग हा ४६ अब्ज डॉलरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याअंतर्गत कृषी क्षेत्रात चिनी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी खैबर-पख्तुनख्वा प्रांताने अनेक गुंतवणूक प्रकल्प तयार केले असून, हा प्रकल्प त्याचाच एक भाग आहे. चीनमध्ये या महिन्यात दोन दिवसांचा रोड शो होत असून त्या वेळी गाढवांची निर्यात करण्याचा प्रस्ताव गुंतवणूकदारांसमोर मांडला जाईल.

‘या प्रकल्पामुळे गाढव पाळणाऱ्या समुदायाच्या सामाजिक-आर्थिक दर्जात सुधारणा होण्यास मदत होईल. हे लोक स्थानिक गाढवांच्या आरोग्याकडे लक्ष देतील तसेच त्यांची संख्या वाढवतील. गाढव प्रजननासाठी नवीन तंत्रज्ञान वापरले जाईल. गाढवांचे दर वाढल्याने मालकांचे, व्यापाऱ्यांचेही उत्पन्न वाढेल,’असे या दस्तावेजात म्हटले आहे. या प्रकल्पाची संभाव्य किंमत १ अब्ज रुपये असेल, पण या योजनेमुळे गुंतवणूक रक्कमच वाढेल असे नाही तर चांगला महसूलही जमा होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.  

गुंतवणूकदारांना हे करावे लागणार 
गाढवांसाठी निवारे बांधणे, वीर्य निर्मितीसाठी इमारती बांधणे, कर्मचाऱ्यांसाठी कार्यालये आणि निवासी परिसर तयार करणे ही कामे गुंतवणूकदारांना करावी लागतील. त्याशिवाय गाढवांची तसेच आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी करणे, सौरऊर्जेपासून आवश्यक ऊर्जा निर्मिती करणे ही कामेही असतील. प्रांतीय सरकार त्यासाठी आवश्यक सुविधा तसेच तांत्रिक आणि अ-तांत्रिक कर्मचारी पुरवेल. प्रांतीय सरकार आणि गुंतवणूकदार यांच्यातील परस्पर सहमतीने स्थापन झालेल्या संयुक्त उपक्रमाद्वारे या प्रकल्पाची अंमलबजावणी होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...