आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचे हिरोशिमा, मुंबईचे नागासाकी करू; आयएसआयच्या माजी प्रमुखांनी ओकली गरळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ इस्लामाबाद - पाकिस्तानची गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटिलिजन्सचे (आयएसआय) माजी प्रमुख व लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल हमीद गूल यांनी भारताला थेट धमकी दिली आहे. टि्वटरवर गूल यांनी म्हटले आहे की, भारताच्या भूमिकेत काही सुधारणा होणार नसेल तर दिल्लीची हिरोशिमा आणि मुंबईचे नागासाकी करून टाकू.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकला आणि प्रचंड जीवित हानी झाली. आजही या भागातील पिढ्या त्याचे परिणाम भोगत आहेत. ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हा बॉम्ब टाकला होता. नेमके ते औचित्य साधून हमीद गूल यांनी टि्वटरवर ही धमकी दिली आहे.

भारतात उधमपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एक दहशतवादी जिवंत पकडण्यात भारताला यश आले. यानंतर लगेच गूल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानातून आलेल्या या दहशतवाद्यांनी उधमपूरमध्ये दोन भारतीय जवानांना गोळ्या घातल्या. यातील एका दहशतवाद्यास गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भारतात घुसखोरी करून हिंदूंना ठार मारण्यासाठीच आपण सीमापार आलो असल्याचे या दहशतवाद्याने जाहीरपणे कबूलही केले आहे.

मुशर्रफहीबरळले होते...
- गेल्या ११ जून रोजी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांनीही असेच भडक वक्तव्य केले होते. ‘पाकिस्तानने अणुबॉम्ब वरातीमध्ये उडवण्यासाठी सजवून ठेवलेले नाहीत. पाकिस्तानी लष्कराने काही बांगड्या भरलेल्या नाहीत आणि पाकिस्तान म्हणजे म्यानमार नाही.’

- भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हल्ले केल्याच्या पार्श्वभूमीवर मुशर्रफ यांनी केलेले हे वक्तव्य तत्कालिक परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे होते.

पाककडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे
गेल्या मार्च महिन्यात बुलेटिन ऑफ द अॅटॉमिक सायन्टिस्टने एक अहवाल प्रसिद्ध केला अाहे. या अहवालानुसार पाकिस्तानकडे ११० अणुबॉम्ब असून भारताकडील बॉम्बच्या तुलनेत दहा अधिक अणुबॉम्ब पाककडे अाहेत. २०१२ मधील परिस्थितीनुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. यानंतरच्या काळात दोन्ही देशांतील अण्वस्त्रांची स्थिती किती बदलली आहे याची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही.

जनरल शरीफही...
पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी भारताला धमकावण्याची ही काही पहिली वेळ नाही. मुशर्रफ यांच्यानंतर पाकचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी तर उधमपूर हल्ल्यानंतर भारतीय जवानांची कारवाई सुरू असतानाच धमकी दिली होती. पाकिस्तानी लष्कराला भारताने आव्हान देऊ नये. याउपरही काही फरक पडणार नसेल तर पाकिस्तानी जवान सडेतोड प्रत्युत्तर देतील, असे शरीफ म्हणाले होते.

भारताच्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाल्याचा दावा
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय जवानांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये दोन पाकिस्तानी नागरिक मारले गेले असल्याचा दावा पाकिस्तानने गुरुवारी केला. या गोळीबाराचा पाकिस्तानने निषेधही नोंदवला आहे. जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानी सीमेच्या दिशेने गोळीबार केल्याचे पाकचे म्हणणे आहे. या वेळी शेतात काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला असल्याचा दावा पाक परराष्ट्र विभागाने केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘भारताने पहाटे साडेपाचच्या सुमारास पाकच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यात सामान्य नागरिकांनाच लक्ष्य केले होते.’