इस्लामाबाद - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीआधी सोमवारी पाकिस्तानने भारताला आरोप-प्रत्यारोप सोडून शांतता चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहंमद आसिफ यांनी भारताला हे आवाहन केले की, तुम्ही पुढे या आणि स्वच्छ मनाने चर्चा सुरू करा.
सियालकोटमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (नवाझ) कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी ख्वाजा मुहंमद आसिफ बोलत होते. ते म्हणाले, भारतात वेगाने वाढणाऱ्या फुटीरतावादामुळे त्यांनी जुनाच मार्ग अवलंबला आहे. पाकिस्तानला भारतासह सर्व देशांसोबत सामान्य संबंध तसेच शांतता हवी आहे. पाकिस्तानचे लष्कर आपल्या देशातील दहशतवाद नष्ट करण्याची मोहीम राबवत आहे. त्यासाठी शेजाऱ्यांशी शांतता आणि सामान्य संबंध निर्माण करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक २३-२४ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत होत आहे. यामध्ये पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. असे असले तरी अद्याप बैठकीचे विषय ठरलेले नाहीत.